

बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्याला सुरुवात होताच सुरगाणा तालुक्यात भात लागवडीच्या तयारीला वेग आला असून, ग्रामीण भागात पारंपरिक 'बांबूचे घोंगडे' तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. मुसळधार पावसात भात रोपलागवडीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे घोंगडे आजही अत्यंत उपयुक्त ठरत असून, आधुनिक साधनांच्या युगातही ही परंपरा कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये बांबूपासून पातळ पट्ट्या तयार करून ज्येष्ठ शेतकरी कौशल्याने बांबूचे घोंगडे विणतात. बाजारात रेनकोट सहज उपलब्ध असले तरी टिकाऊपणा, आरामदायी वापर आणि शेतातील कामासाठी अधिक सोयीचे असल्याने अनेक शेतकरी आजही पारंपरिक घोंगड्यालाच पसंती देतात.
डोक्यावर व पाठीवर बसणाऱ्या या घोंगड्यामुळे मुसळधार पावसापासून शरीराचे संरक्षण होते. तसेच दोन्ही हात मोकळे राहत असल्याने भाताची रोपलागवड अधिक सहज आणि वेगाने करता येते. त्यामुळे भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने बांबूचे घोंगडे हे आजही अत्यंत महत्त्वाचे साधन मानले जाते.
अतिवृष्टीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे. त्यामुळे दरवर्षी लागवडीपूर्वी बांबूचे घोंगडे तयार करण्याची परंपरा आजही उत्साहात जपली जाते. ही केवळ शेतीची गरज नसून आदिवासी संस्कृती, पारंपरिक ज्ञान आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ मंडळी नव्या पिढीला हे कौशल्य शिकवत असल्याने ही लोककला आणि परंपरा पुढील पिढीकडेही पोहोचत आहे.
रेनकोटपेक्षा बांबूचे घोंगडे अधिक सोयीचे असते. पावसात तासन्तास काम करताना शरीराचे चांगले संरक्षण होते आणि रोपलागवड करताना कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे आजही आम्ही ही परंपरा जपतो.
झामरू बोरसे, शेतकरी, हरणटेकडी