Surgana Patient News | रस्ता, पुलाअभावी रुग्णाला डोलीतून नदी पार!

Surgana Patient News | खिरपाडा - वांगणपाड्यातील दुर्दशा; उपचारासाठी गुजरातमधील माणी रुग्णालय गाठण्याची ग्रामस्थांवर वेळ
Surgana Patient News
Surgana Patient News
Published on
Updated on

बोरगाव : लक्ष्मण बागूल

विकासाच्या गप्पा आणि जमिनीवरील वास्तव यातील फरक दाखवणारे धक्कादायक चित्र सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा समोर आले. खिर्डी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या खिरपाडा - वांगणपाडा परिसरात नदीवर पूल नसल्यामुळे आजारी रुग्णाला चक्क डोलीत झोपवून नदी पार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.

Surgana Patient News
Sangli Accident : बोरगाव येथे मोटारीच्या धडकेत पाच जखमी

रस्ता खराब असल्यामुळे वाहन पोहोचत नाही आणि पूल नसल्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रुग्णाला नदी आणि दगड - धोंड्यांशी झुंज द्यावी लागत आहे. खिरपाडा येथील भास्कर पांडू तुरे (२२) हे गेल्या चार - पाच दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी बान्हे येथे नेणे आवश्यक होते.

मात्र, बान्हेकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब, वाहन जाण्यास अडचण निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहनचालकही गावापर्यंत येण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार आहे. दरम्यान, गुजरातची हद्द जवळ असल्यामुळे पार नदी ओलांडून गुजरातमधील माणी येथील रुग्णालय गाठणे तुलनेने सोपे असल्यामुळे ग्रामस्थांनी रुग्णाला डोलीतून नदी पार नेण्याचा निर्णय घेतला.

नदी पार केल्यानंतर तब्बल पाच किलोमीटर पायपीट करून रुग्णाला माणी येथील रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णाला डोलीतून नेण्यासाठी पांडू तुरे, बाळू तुरे, रमेश इजल, प्रभू इजल, लशी निंबारे, पांडू राठोड तसेच रुग्णाच्या आईने खडतर प्रवास केला. नदीकाठाचा खडकाळ मार्ग, पाण्याची परिस्थिती आणि रुग्णाची अवस्था यामुळे हा प्रवास अत्यंत धोकादायक ठरला.


आरोग्यसेवेची अपेक्षा कोणाकडून करायची?

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचविणे ही मूलभूत गरज आहे. मात्र, गावापर्यंत रस्ता नाही, नदीवर पूल नाही आणि रुग्णवाहिकेला पोहोचण्याची सोय नाही, अशी परिस्थिती असेल, तर दुर्गम भागातील नागरिकांनी आरोग्यसेवेची अपेक्षा तरी कोणाकडून करायची? पावसाळ्यात पार नदीची पाणीपातळी वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुले किंवा गंभीर रुग्णांना नदीतून नेण्याची वेळ आली आणि अनर्थ घडला, तर जबाबदारी कोणाची? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

Surgana Patient News
Cattle illegal transport: बोरगाव येथे गोवंश वाहतूक पकडली

विकासाच्या दाव्यांना पार नदीचा आरसा!

एका रुग्णाला डोलीतून नदी पार करावी लागणे ही केवळ एका कुटुंबाची अडचण नाही. ही सुरगाण्यातील दुर्गम भागातील रस्ता, पूल, आरोग्य आणि दळणवळण व्यवस्थेची वस्तुस्थिती आहे.

ग्रामस्थांकडून पार नदीवर कायमस्वरूपी पूल, गावापर्यंत पक्का रस्ता आणि नियमित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेकदा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नसल्याची त्यांची तक्रार आहे. पाहणी, आश्वासने आणि कागदावरील प्रस्ताव आता नकोत, प्रत्यक्ष पूल आणि रस्ता हवा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news