

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सनी पगारेच्या पत्नीशी अनैतिक संबंध आणि त्यातून स्वतःच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीती तसेच अमली पदार्थांच्या जुन्या व्यवहारातून निर्माण झालेले वैमनस्य, या पार्श्वभूमीवर सुमित पगारेची हत्या घडवून आणल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन पिवाल याच्या मनात सनी पगारेविषयी तीव्र राग होता.
सनीकडून आपल्यावर हल्ला होण्याची भीती अर्जुनला असल्याने, भविष्यातील धोका टाळण्यासाठी सनीचा भाऊ सुमितला लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व बाबी अद्याप सूत्रांकडून मिळालेल्या आहेत.
आर्थिक वर्चस्ववाद, अमली पदार्थांच्या व्यवसायातील जुने व्यवहार, कारागृहातील वैमनस्य आणि खासगी आयुष्यातील संबंधांचा वाद या बाबी तपासाच्या केंद्रस्थानी असल्याचे समजते. सुमित पगारे, त्याचा मोठा भाऊ सनी पगारे, अर्जुन पिवाल हे अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंधित होते. यातून मोठी उलाढाल झाल्याचीही चर्चा आहे.
या तिघांनी सोलापूरला अमली पदार्थनिर्मितीचा कारखाना उभारल्याचे सांगितले जाते. मात्र, कालांतराने आर्थिक व्यवहार, व्यवसायातील वर्चस्व आणि एकमेकांबद्दल असलेल्या संशयामुळे संबंध बिघडले. सुमित व सनी पगारे आणि अर्जुन पिवाल हे अडीच वर्षे कारागृहात एकत्र होते. त्या काळात सनीने अर्जुनविरोधात दिलेल्या जबाबामुळे त्याच्यावर कारवाई झाल्याचा राग अर्जुनच्या मनात होता.
या काळात सनी पगारेच्या पत्नीशी अर्जुन पिवालचे संबंध असल्याची माहिती सनीला समजल्यानंतर दोघांतील वाद अधिक वाढला होता. सनीने अर्जुनला संपवण्याबाबत अनेकदा वक्तव्य केल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे अर्जुनच्या मनात सनीविषयी भीती आणि राग दोन्ही होते, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, अमली पदार्थांच्या गुन्ह्यात आपले नाव घेतल्याचा रागही अर्जुनच्या मनात होता.
काही महिन्यांपूर्वी सुमित पगारेला जामीन मिळाला होता. आता सनी पगारेचीही जामीन होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती अर्जुन आणि साथीदारांना होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सुमित बाहेर आल्यानंतर संघर्ष होण्याची शक्यता असल्याने त्याला आधीच लक्ष्य करण्यात आले.
एकंदरीत, सुमित पगारेच्या हत्येमागे आर्थिक वर्चस्वाचा वाद नसून, अमली पदार्थांच्या व्यवसायातील जुने संबंध, कारागृहातील वैमनस्य, सनी पगारेची पत्नी सनाशी अर्जुन पिवालचे कथित संबंध आणि स्वतःच्या जिवाला असलेली भीती, अशा अनेक कारणांचा गुंता असल्याची चर्चा आहे. या सर्व बाबींची अधिकृत सत्यता पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.