

schools to establish “Sugar Boards” : A dedicated awareness initiative designed to monitor and educate students about the dangers of excessive sugar intake.
नाशिक : मुलांमध्ये लहान वयात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये 'शुगर बोर्ड' स्थापन करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. मात्र ही जबाबदारी शाळांवर नको, यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून काहींनी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांवर अधिक जबाबदाऱ्या आणि कामे शासनाकडून देण्यात येतात. त्यामुळे नवीन जबाबदारी नको, अशा भावाना व्यक्त केल्या.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने राज्यातील प्रत्येक शाळेत 'शुगर बोर्ड' स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये शुगर बोर्ड स्थापन करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक यांची एकत्रित समितीही नेमली जाणार आहे. बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समुपदेशन आहाराविषयी माहिती त्यांची नियमित आरोग्य तपासणी त्याचे कौटुंबिक शारीरिक इतिहास, शारीरिक व्यायामाचे नियोजन आणि मधुमेहासंदर्भात कार्यशाळा, जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार आहेत. शाळांमध्ये पालक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी तसेच स्थानिक डॉक्टरांच्या सहभागातून शुगर बोर्डाची कार्यकारिणी काम करणार आहे.
मात्र या निर्णयान्वये शाळांना याबाबत कार्यवाही करावी लागणार आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य, आहार-विहार याला मार्गदर्शन मिळणार आहे, असे सांगितले जाते. मात्र याबाबत येथील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असते त्यांच्यामध्येही याबाबत अनभिज्ञता दिसून आली.
शाळा व्यवस्थापन, शिक्षकांवर विविध कामे-उपक्रमांचा बोजा असतो. त्यामुळे ही नवीन जबाबदारी निभावण्यास किती वेळ मिळतो हा प्रश्नच आहे. शाळांमध्ये असे बोर्ड स्थापन करण्यापेक्षा मधुमेही विद्यार्थ्यांच्या पालकांना आहार-विहाराचे मार्गदर्शन देणे, अधिक योग्य ठरेल.
प्रकाश वैशंपायन, अध्यक्ष, न्यू एज्युकेशन सोसायटी
निणर्याचा हेतू चांगला परंतु यातून १०० टक्के फलनिष्पत्ती साध्य होणार नाही. सरकारी शाळांमध्ये पोषाक आहार दिला जातो. अन्य शाळांमध्ये मुले डब्बे घेऊन येतात. शाळांमध्ये कधीही प्रक्रिया केलेले, पॅकबंद आणि शर्करा, स्थुलत्व वाढवणारे जंक फूड दिले जात नाहीत. ती बाहेरच खाल्ली जातात. त्यामुळे ही पालकांची सर्वस्वी जबाबदारी आहे.
प्रा. दिलीप फडके. अध्यक्ष, ना. ए. सोसायटी, नाशिक.
चुकिची जीवनशैली उर्जा सघन (एनर्जी डेन्स फूड) आणि अधिक शर्करायुक्त व तैलीय पदार्थांचे अधिक सेवनाने मुलांमध्ये स्थुलत्व येते आणि स्थुलत्वामुळे मुलांमध्ये टाईप-२ हा मधुमेह होण्याचा धोका असतो. शासनाच्या निर्णयान; मुलांमधील मधुमेह आणि जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे
डॉ. तुषार गोडबोले, बालकांमधील मधुमेह तज्ज्ञ