

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकत्र आले तरी, भाजपचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचा दावा माजी मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाचे मुनगुंटीवार यांनी स्वागत केले आहे.
माजीमंत्री मुनगुंटीवर सोमवारी (दि.4) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुनगुंटीवर म्हणाले की, कार्यकर्त्यांनीही एकत्र यावे, या राज ठाकरेंच्या विधानात गैर काहीच नाही. राज-उध्दव एकत्र आले तरी दूरदूरपर्यंत भाजपचे नुकसान होणार नाही. जोपर्यंत आम्ही चांगले काम करू तोपर्यंत जनता आमच्या सोबत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत, मुनगुंटीवर म्हणाले की, न्यायालयाने निकाल दिल्यामुळे आता तात्काळ निवडणुका होणे गरजेचे आहे. निवडणुका होत नाहीत. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसत आहे. राज्यात एका आयुक्ताचे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण समोर आले असून त्याच्याकडे जवळपास एक हजार कोटींची मालमत्ता सापडली आहे. लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने हे घडत असल्याचा दावाही मुनगुंटीवार यांनी यावेळी केला. पुण्यातील घटनेत गुन्हा नोंद होत नाही ही चिंतेची बाब असून अशा गोष्टींचे चितंन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अन्य पक्षातून भाजपमध्ये प्रवेश देताना स्थानिकांना विश्वासात घेतले नाही, तर कार्यकर्ते नाराज होतात, असे सांगत पक्ष म्हणजे शनी शिंगणापूर नव्हे आणि सर्वासाठी दरवाजे उघडे नको, असा टोलाही मुनगुंटीवार यांनी स्वपक्षाला लगावला आहे. ही माझी सूचना नसून कार्यकर्त्यांची भावना असल्याचही सारवासारवरही त्यांनी यावेळी सांगितले.