

नागपूर : राजकीय नेता म्हणून आम्ही दररोज शेकडो लोकांसोबत फोटो काढत असतो. कुणी कुणासोबत फोटो काढणे वाईट नाही. फोटो काढला नाही तर गर्विष्ठ अशी आमची प्रतिमा तयार होते. मात्र अशा पद्धतीने एखादा व्यक्ती गैरवापर करीत असेल तर आम्ही दूर राहिले पाहिजे. आम्हाला माहित असेल हा गुंड प्रवृत्तीचा आहे. तर आम्ही त्याच्यासोबत फोटो काढता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलणाऱ्या लोकांवर ठोस कारवाई व्हायला पाहिजे. आता पोलिस काय करतात ते बघू, अशी रोखठोक भूमिका माजी मंत्री भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि.३) माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. एकप्रकारे सध्या चर्चेत असलेल्या प्रशांत कोरटकर प्रकरणी त्यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले असेच म्हणता येईल.
सध्या फीक्सर शब्दावरून राजकारणात गदारोळ सुरू आहे. याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, फिक्सरबद्दल माझी प्रतिक्रिया कडक आहे. खरेतर अशा फिक्सरची माहिती देणाऱ्यांना ५० लाखाचे बक्षीस दिले पाहिजे. डेस्क ऑफिसर आपलं आयुष्य उध्वस्त होईल म्हणून त्यावर बोलत नाहीत, असा टोलाही लगावला. कापूस आणि सोयाबीनला मिनिमम सपोर्ट प्राईस मिळाली पाहिजे. विधानसभेत या विषयावर प्रश्न उपस्थित होईल सरकारच्या वतीने यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास आहे. मंत्री धनंजय मुंडे राजीनामा प्रकरणी करुणा मुंडेनी काय म्हटले ते ऐकले. सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौकशीत तथ्य असल्यावर कारवाई होईल. थोडी वाट पाहिली पाहिजे, असा विश्वास मुनगंटीवार यांनी बोलून दाखविला.
रक्षा खडसे यांच्या मुलीबाबतचा अतिशय दुःखद आणि दुर्दैवी प्रसंग आहे. टवाळखोर लोक मुलींना त्रास देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ज्या पद्धतीने शिक्षा दिली त्याच पद्धतीची शिक्षा अशा टवाळखोराना दिली पाहिजे. निश्चितच काही कायदे बदलण्यासाठी अशासकीय विधेयक मी सुद्धा मांडणार आहे.
देशात कोणत्या राज्यात नव्या नंबर प्लेटचे काय दर आहे. या अनुषंगाने मी केंद्र सरकारकडे माहिती मागितली आहे. विशिष्ट कंपन्यांना ते काम देतात का? या संदर्भात माहिती घेऊन त्याची जिल्हास्तरावर वाटप करता येईल का? या अनुषंगाने योग्य अभ्यास करून त्यावर अभिप्राय देईल असा सावध पवित्रा घेतला.