

पुढारी ऑनलाइन डेस्क | संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी बढती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती सुरु झाली. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले. आजूनही ही गळती कायम आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गळती रोखण्यासाठी संजय राऊत यांनी नाशिकची चक्रे फिरवली आहेत. काही दिवसांपूर्वीच ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांनी त्याचवेळी फेरबदलाचे संकेत दिले होते.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला नाशिकमध्ये मोठे यश मिळाले. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा पराभव केला. ठाकरे सेनेच्या या विजयात बडगुजर यांचा मोठा वाटा आहे, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची बढती केली आहे.
सन 2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2008 मध्ये बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत त्यांचा प्रवेश झाला. तेव्हापासून आजपर्यंत ते शिवसेनेत कार्यरत असून दरम्यान त्यांनी अनेक पदे भूषवली. यावेळीही 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. सुधाकर बडगुजर याआधी नाशिक जिल्हाप्रमुख होते. आता त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.