कांदा उत्पादकांना अनुदान मिळण्यास प्रारंभ

कांदा उत्पादकांना अनुदान मिळण्यास प्रारंभ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर गुरुवारी (दि. ७) प्रत्यक्ष जमा होणार आहे. भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणीत सरकार एकटे सोडणार नाही. खंबीर पणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदान वितरणाचा ऑनलाईन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला.

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

कांदा अनुदानासाठी १० कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, जालना, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.

१० कोटी पेक्षा जास्त कांदा अनुदानासाठी मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार पर्यत अनुदान जमा होईल. ज्या शेतकऱ्यांची १० हजारपर्यंतची देयके आहेत. त्यांचे पूर्ण अनुदान जमा होईल. तर ज्या लाभार्थ्यांचे देयक १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news