नाशिक : ईद-ए-मिलादनिमित्त सोमवारी (दि. १६) जुने नाशिक परिसरातून मुस्लीम बांधव मिरवणूक काढणार आहेत. तसेच मंगळवारी (दि. १७) गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे या दोन्ही मिरवणुकांमध्ये हजारो बांधव, भाविक सहभागी होणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मिरवणूक मार्ग बॅरिकेडिंग करण्यात आला आहे.
ईद-ए-मिलाद व गणेश विसर्जन हे दोन्ही सण यंदा पाठोपाठ आले आहेत. दोन्ही सणांना मिरवणूक निघत असल्याने बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळचे उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस अंमलदार असा सुमारे पाचशे पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात असणार आहे.
भद्रकालीतून प्रारंभ होणाऱ्या मिरवणुकींमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तर मिरवणुकीच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.