

Impact of Maharashtra Electricity Rate Hike on Steel Industry
नाशिक : वीजदरवाढीविराेधात जिल्ह्यातील स्टील उत्पादक कंपन्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मंगळवारपासून (दि. १) कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदमध्ये जिल्ह्यातील १० कंपन्या सहभागी झाल्या असून, यातील काही कपन्यांनी पूर्णपणे उत्पादन थांबविले आहे. काही कंपन्यांनी ५० टक्के क्षमतेने उत्पादन सुरू ठेवले आहे. बंदमुळे उद्योजकांना महिन्याकाठी १०० कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दिवसाला आठ लाख युनिट वापरले जाणार नसल्याने, महावितरणला तब्बल ८० लाख रुपये दररोज फटका सोसावा लागणार आहे.
दिवसाला एक हजार टन उत्पादन थांबले
आठ लाख युनिट वापराविना
महावितरणला ८० लाखांचा फटका
उद्योजकांना दिवसाला १०० कोटींचा तोटा
एक हजार कामगारांचा रोजगार धोक्यात
बंदमध्ये १० कंपन्यांचा सहभाग
शासनाचा १८ टक्के जीएसटीही बुडणार
सातपूर, अंबड, दिंडोरी आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपन्या असून, त्या २४ तास वीजेवर चालत असल्याने त्यांचा उत्पादन खर्च वीज दरावर अवलंबून आहे. वाढीव वीजदर टाळण्याची मागणी असतानाही राज्य शासनाने वीज दरवाढीचा शॉक दिल्याने उद्योजकांचे अर्थकारण कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेत, मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले.
जिल्ह्यातील लहान-मोठ्या १० स्टील कंपन्यांपैकी काहींनी पूर्ण कामबंद ठेवले असून, काही कंपन्या अर्ध्या क्षमतेवर चालू आहेत. वीज दरवाढीच्या विरोधात या कामबंद आंदोलनात सर्व कंपन्यांचा सहभाग आहे. उद्योजकांना यामुळे तोटा होण्याची शक्यता असली तरी वीज दरवाढीपासून दिलासा मिळाल्याचे समाधान आहे. दररोज सुमारे आठ लाख युनिट वीज न वापरल्यामुळे महावितरणलाही सुमारे ८० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. उद्योजकांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीची अपेक्षा असून, पावसाळी अधिवेशनामुळे भेट होणार की नाही? याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात २०१६ पर्यंत एकुण ३१ स्टील कंपन्या होत्या. मात्र, वीजदरवाढ व अन्य कारणांमुळे २१ कंपन्या बंद पडल्या असून, आता केवळ लहान-मोठ्या दहाच कंपन्या सुरू आहेत. कंपन्या बंद पडण्यामागे राज्य शासनाचे वीज दरवाढीचे धोरण कारणीभूत असल्याचे बोलले जाते. दरम्यान, २०१६ पासून स्टील उद्योजक वीजेचे दर शेजारील राज्यप्रमाणे करावेत, अशी मागणी करीत आहेत.
स्टील उद्योगात सुमारे एक हजार कामगार कार्यरत आहेत. सध्या कामबंद असले तरी, कामगारांना कंपन्यांकडून वेतन दिले जात आहे. मात्र, कामगारांच्या वेतनाबाबत पुढील दोन ते तीन दिवसात निर्णय घेतला जाईल, असेही संकेत काही कंपनी व्यवस्थापनाने दिल्याने, त्यांचा रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत महिन्यात सात ते आठ कोटी इतके वीजबिल येते. दरवाढीमुळे त्यात १० टक्क्यांची भर पडल्याने अतिरिक्त ७० ते ८० लाख रुपयांचा भार पडला आहे. जो असह्य आहे.
अजय बहेती, स्टील उद्योजक, नाशिक.
स्टील उद्योजकांच्या बंदचे नेमके कारण समजले नाही. त्यांचा नेमक्या कोणत्या वीजदराला विरोध आहे, याबाबत त्यांनी चर्चा करायला हवी. वीजेचा वापर करणारे इतरही मोठे उद्योग आहेत. मात्र, त्यांनी कंपन्या बंद केल्या नाहीत. चर्चा केल्यास प्रश्न सुटू शकेल.
सुंदर लटपटे, मुख्य अभियंता, नाशिक परिमंडळ, महावितरण