

लासलगाव (नाशिक) : यंदा येथील बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक झाल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक भाव न मिळाल्याने 'उतारा चांगला पण हातात पैसा कमी' अशी भावना गावागावातून व्यक्त होत आहे. सोयाबीनचा प्रति क्विंटलला सरासरी बाजारभाव ४३०० रुपये तर कमाल ५१०० भाव रुपये नोंदविला गेला आहे.
यंदा पावसाअभावी सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. तरीही आवक जास्त होत असल्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांची साठवणूक क्षमताच कमी झाली आहे. शेतकरी पीक घरात न ठेवता थेट बाजारात आणत आहेत. तसेच राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत बेभरवशाची असल्यामुळे हातात पैसे मिळेल, याची शाश्वती नसल्यामुळे तात्काळ सोयाबीन विक्रीस काढला जात आहे.
याआधी शेतकरी दिवाळीनंतर दर वाढतील, या आशेने सोयाबीन साठवून ठेवत होते. मात्र सध्याची परिस्थिती बदलली असून, दर मिळो ना मिळो, पैसा हवा हा दृष्टिकोन वाढतो आहे. सटाणा, बागलाण, नांदगाव, येवला, चांदवड आणि मालेगाव हे तालुके सोयाबीनच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. या भागातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे दर्जेदार उत्पादन घेतले.
गेल्या दोन-तीन वर्षापासून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये अनिश्चितता असल्याने मोठी आवक दिसत असली तरी भविष्यात सोयाबीन आवकेत घट होणार आहे.
डी. के. जगताप, सभापती, बाजार समिती
दिवाळीच्या तोंडावर पैशाची गरज म्हणून माल बाजारात विक्रीस येत असल्याने मोठ्या प्रमाणात आवक दिसून येत आहे.
नीलेश ब्रम्हेच्या, व्यापारी
बाजारात चांगला दर मिळेल याची खात्री नाही. सरकारने साठवणूक आणि हमीभाव यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे
सुभाष डुंबरे, शेतकरी, वाहेगाव (भरवस)