

नाशिक : अंजली राऊत
मविप्रचे राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी स्मार्ट रेल्वे क्रॉसिंग अॅन्ड ऑब्स्टॅकल डिटेक्शन सिस्टम हा प्रकल्प साकारत रेल्वे सुरक्षिततेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे अपघात घटणार असून, स्वयंचलित रेल्वे गेट नियंत्रण आणि अडथळा तत्काळ शोधणारी प्रणाली यांचा प्रभावी संगम यामध्ये करण्यात आला आहे.
विद्यार्थिनींनी दोन महत्त्वाच्या उपप्रणाली विकसित केल्या आहेत. अल्ट्रासोनिक सेन्सर्सच्या मदतीने रेल्वे ट्रॅकवरील अडथळे ओळखून लोको पायलटला तत्काळ सूचना देणे तसेच क्रॉसिंगजवळ बसवलेल्या सेन्सर्सद्वारे ट्रेनची अचूक ओळख करून गेट आपोआप बंद व उघडण्याची प्रक्रिया राबवणे या प्रणाली आहेत. प्रा. जी. बी. घंगाळे व विभागप्रमुख पी. जी. देशमुख यांचे मार्गदर्शन घेत पडताळणी प्रक्रिया अधिक सक्षम करण्यात आली. तसेच वीज नियंत्रण प्रणाली सुधारून प्रकल्प अधिक विश्वासार्ह बनवण्यात आला आहे. गायत्री कात्रे, चैताली गुरव, वेदिका केदार आणि वेदिका काकड यांनी हा प्रकल्प साकारला आहे. प्राचार्य प्रा. प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अशी आहे स्मार्ट प्रणाली
प्रकल्पामध्ये आधुनिक मायक्रो कंट्रोलर आणि अल्ट्रासोनिक सेन्सर्सच्या मदतीने ट्रेनचा वेग मोजून त्यानुसार रेल्वे फाटक आपोआप बंद आणि उघडले जाते. ट्रॅकवर कोणताही अडथळा आढळल्यास ही प्रणाली त्वरित ट्रेनचालकाला सतर्क करते. या प्रणालीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे स्वयंचलित असून, मानवी हस्तक्षेप कमी करते. मानवी चुका टाळून रेल्वे क्रॉसिंगवरील सुरक्षितता वाढविण्यास मदत होते. तसेच, वायरलेस कम्युनिकेशनच्या साहाय्याने कंट्रोल रूमपर्यंत माहिती पाठविण्याची सुविधाही उपलब्ध होते.
या प्रकल्पामुळे रेल्वे अपघात टाळता येईल, असा आम्हाला विश्वास आहे.
- वेदीका काकड, विद्यार्थिनी
या प्रकल्पामुळे विद्यार्थिनींचा आत्मविश्वासात भर पडली असून, भविष्यात अशाच नावीन्यपूर्ण प्रकल्पांवर काम केले जाणार आहे.
- डॉ. डी. डी. लोखंडे, शिक्षणाधिकारी
पाच महाविद्यालयांत हा प्रकल्प सादर करण्यात आला होता. त्यात गुरू गोबिंद सिंग महाविद्यालयाकडून आमच्या प्रकल्पाला बक्षीस मिळाल्याने आनंद वाटतो.
- चैताली गुरव, विद्यार्थनी
विद्यार्थ्यांनी जिज्ञासूपणे व मेहनतीने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला असून, त्यांच्या कल्पकतेचे हे उत्तम उदाहरण आहे.
- प्रा. जी. बी. घंगाळे, प्रकल्प मार्गदर्शक
नवनबीन कल्पनेला चालना देणाऱ्या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आहे.
- प्रा. पी. जी. देशमुख, विभागप्रमुख
स्मिार्ट रेल्वे क्रॉसिंग व ऑब्स्टॅकल डिटेक्शन प्रणालीत रेल्वेसमोर अनाहूतपणे व्यक्ति आल्यास अलर्ट मोडकरिता रेल्वेला सेन्सर्स लावण्यात आले आहेत. जेणेकरून काही किलोमीटर अंतरावर ऑब्स्टॅकल डिटेक्शन होऊ शकेल आणि रेल्वेची गती कमी करता येईल.
- वेदिका केदार, विद्यार्थिनी
सेफ्टी सिस्टममध्ये रीसर्च करून रेल्वे क्रॉसिंगवर अनेक अपघात होत असल्याचे समोर आहे. सेफ्टीसाठी करण्यात आलेली ही प्रणाली नक्कीच उपयोगी आहे.
- गायत्री कात्रे, विद्यार्थिनी