

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिडकोतील कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणानंतर श्रावणी अनिल पाटील या सोळावर्षीय मुलीचा ओढवलेला मृत्यू तीव्र अॅलर्जिक प्रतिक्रियेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नोंदविला आहे. मृत्यूचे सविस्तर कारण शोधण्यासाठी त्या मुलीच्या त्वचेचे, रक्ताचे नमुने तसेच व्हिसेरा नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत.
कामटवाडे आरोग्य केंद्रांतर्गत दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे बाह्य लसीकरण सत्र दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी घेतले जाते. नियमित लसीकरण सत्र सुरू असताना दि. २४ जून रोजी श्रावणी पाटील ही धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस घेण्यासाठी आली होती. तिला १२ वाजून ४० मिनिटांनी लस देण्यात आली होती.
त्याच्यानंतर ती घरी जात असताना चक्कर येऊन ती पडली होती. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस दिल्यानंतर लाखातील काही जणांमध्ये अॅलर्जिक प्रतिक्रिया दिसून येते. काही लोकांमध्ये ती अधिक तीव्र असण्याची शक्यता असते.
श्रावणीला अशा प्रकारे तीव्र अॅलर्जी झाली असावी. त्यातून ती चक्कर येऊन कोसळल्यामुळे मेंदूला मार लागला, असा निष्कर्ष या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखालील एईएफआय समितीच्या बैठकीत काढण्यात आला.
शिल्लक लस तपासणीसाठी केंद्रीय संशोधन संस्थेकडे
ज्या व्हायलमधून श्रावणीला लसीचे इंजेक्शन देण्यात आले होते, त्या व्हायलमधील शिल्लक लसीचे नमुने तपासणीसाठी हिमाचल प्रदेशातील केंद्रीय संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. या लसीमध्ये काही दोष तर नाही ना, याचादेखील तपास वैद्यकीय विभागाकडून केला जात आहे.