

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिडकोतील कामटवाडे येथील १६वर्षीय मुलीचा मृत्यू महापालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणानंतर ओढावल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित लसीचा नमुना उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिली आहे. दरम्यान, या मुलीला ज्या व्हायलमधून लस दिली गेली त्यातून अन्य पाच जणांना लस देण्यात आली होती. त्यापैकी कोणालाही अशा प्रकारचा त्रास जाणवला नसल्याचा दावा वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आला आहे.
कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे बाह्य लसीकरण सत्र दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी घेतले जाते. वैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार नियमित लसीकरण सत्र सुरू असताना, श्रावणी अनिल पाटील (१६) ही मुलगी धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस घेण्यासाठी आली होती. तिला १२ वाजून ४० मिनिटांनी लस देण्यात आली होती. त्याच्यानंतर ती घरी जात असताना तिला चक्कर येऊन ती पडली. पडल्यानंतर ती बेशुद्धावस्थेत गेली.
तिच्या पालकांनी खासगी रुग्णालयात नेले आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिस पंचनामा करून शवविच्छेदन झाले आहे. या मुलीने धनुर्वात व घटसर्प प्रतिबंधित लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येत आहे. ज्या व्हायलमधून श्रावणी पाटील हिला इंजेक्शन दिले होते, त्याच व्हायलमधून एकूण ६ जणांना ही लस दिली होती. त्यामध्ये ४ गरोदर स्त्रिया होत्या व एक १६ वर्षाची मुलगी होती. याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली.
१२० जणांना टोचली 'ती' लस
एईएफआय कमिटी बैठक गुरुवारी (दि. २५) जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात पार पडली. संबंधित लसीचा नमुना सखोल उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही लस केंद्र सरकारमार्फत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला पुरविली जाते. वैद्यकीय विभागाला लसीचा जो साठा प्राप्त झाला होता, त्यापैकी २४ व्हायल शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामटवाडे येथे पाठविण्यात आले होते.
त्यापैकी १२ व्हायल वापरण्यात आलेले आहेत. साधारण एका व्हायलमध्ये आपण १० जणांना लस देत असतो. या केंद्रामार्फत आतापर्यंत आपण १२० लसीकरण पूर्ण केलेले आहे. लस घेतलेल्या सर्वांना वैयक्तिक फोन करून चौकशी केली आहे. त्यापैकी कोणालाही त्रास झालेला नाही, असा दावा वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आला आहे.