

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
पतीला विजेच्या धक्क्यातून वाचविण्यास गेलेल्या अर्धांगिणीला विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथे गुरुवारी (दि. १२) सकाळी ७ च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, छाया दीपक खाडे (३८) असे मृत महिलेचे नाव आहे.
त्या पती दीपक चिंतामण खाडे (४३) यांच्यासह शहा पंचाळे रस्त्यालगत हॉटेल कुबेरच्या मागे असलेल्या शेतात गट नं. २१६ मध्ये पिकांना पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दीपक खाडे विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का बसला. त्यावेळी पती दीपक यांना वाचविण्यासाठी धावलेल्या छाया यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात पती दीपक यांच्यासह छाया झाल्या.
दोघांनाही तातडीने सिन्नर येथे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, छाया खाडे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दीपक खाडे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ह्यादेखील गंभीर जखमी पोलिस पाटील शांताराम कोकाटे यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.