

जानोरीः पुढारी वृत्तसेवा
२०२६-२७ मधील नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जानोरी येथे गुरुवारी (दि. १२) नियोजन बैठक उत्साहात पार पडली. नाशिक कुंभमेळ्यातील चार पारंपरिक चौक्यांपैकी जानोरी ही महत्त्वाची चौकी मानली जाते. येथे दि. २२ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण आणि अमृत स्नानाचा सोहळा होणार असून, यात साधू-महंतांसह मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
पूर्वी कुंभमेळ्याच्या वेळी साधू-महंत पायी, घोडेस्वारीने किंवा बैलगाडीतून येऊन मुख्य स्थळापासून १० ते १५ किमी अंतरावर एकत्र थांबत असत. त्या ऐतिहासिक परंपरेमुळे जानोरीला विशेष धार्मिक महत्त्व आलेले आहे.
गावाशेजारी वाहणाऱ्या बाणगंगा नदीत स्नान होणार असून, येथे सीता स्वयंवराशी संबंधित प्रभू श्रीरामाचे निर्मोही आखाडा, दिगंबर आघाडी वारकरी आखाड्याचे मंदिर आहे. २०१५ मध्येही येथे पर्वणी पार पडली होती.
डॉ. भक्तिचरणदास महाराज यांनी सांगितले की, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळा होणार असून, जानोरीतील पर्वणीसाठी सर्व आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित राहतील. आवश्यक सुविधा व खर्चासाठी प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी जानोरीचे कुंभपर्वणीतील महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, सुमारे ४० ते ५० हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
घाट दुरुस्ती व इतर विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार असून, आयोजन भव्य करण्यासाठी सर्व आघाड्यांचे सहकार्य लाभणार आहे.
बैठकीला डॉ. भक्तिचरणदास महाराज, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके, सरपंच सुभाष नेहरे, ग्रामसेवक नानाभाऊ कांडेकर तसेच ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.