

सिन्नर : संदीप भोर
सुमारे एक लाख लोकसंख्येच्या सिन्नर शहरासाठी असलेल्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दररोज २५० वर बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. वैद्यकीय कायदेशीर प्रकरणांचाही भार वेगळा ! मात्र संपूर्ण रुग्णालयाचा कारभार केवळ एका डॉक्टरवर चालत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
तीन पदे मंजूर असताना केवळ एकच डॉक्टर कार्यरत असल्याने रुग्णसेवेवर विपरित परिणाम होत आहेत. ३० बेड क्षमतेच्या या उपजिल्हा रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टरांची तीन पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या बालरोगतज्ज्ञ डॉ. चेतन ठोंबरे हे एकमेव डॉक्टर कार्यरत आहेत. भूलतज्ज्ञ डॉ. संजय बलवे यांनी वर्षभरापूर्वी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असून, स्त्रीरोगतज्ज्ञाचे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा अडचणीत सापडली आहे.
रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड या स्वतः स्त्रीरोगतज्ज्ञ असून, त्या प्रशासकीय कामकाजाबरोबरच उपलब्ध वेळेत महिला रुग्णांची तपासणी करीत आहेत. गेल्या वर्षभरात एकेक करीत जवळपास सात ते आठ कंत्राटी डॉक्टर येथे रुग्णसेवेसाठी आले. मात्र कामाचा ताण लक्षात घेऊन केवळ दीड-दोन महिन्यांतच राजीनामा देऊन बाहेर पडले. दरम्यान, सिन्नर शहराची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे.
दररोज बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) २०० ते २५० रुग्ण तपासणीसाठी येतात. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय प्रशासनावर ताण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी सिन्नरकर करीत आहेत.
दरम्यान, नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी नाशिक जिल्हा रुग्णालयात कार्यरत असल्याचे समजते. नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी याबाबात जिल्हा रुग्णालयास पत्र देऊन त्यांची ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती करण्यास शिफारस केली. संबंधित डॉक्टरांना दि. १८ मार्च २६ रोजी तेथून कार्यमुक्त करण्यात आले असल्याचे समजते. मात्र त्यांनी अद्यापही सिन्नर ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधलेला नसल्याचेही समजते.
विवाह नोंदणी ग्रामीण रुग्णालयाकडे वर्ग
यापूर्वी सिन्नर नगर परिषदेत होत असलेली विवाह नोंदणी गेल्या तीन वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. हे प्रशासकीय कामकाज नगर परिषदेकडेच असायला हवे, अशी चर्चा आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असताना विवाह नोंदणीचा भार टाकल्यामुळे कामाचा ताण वाढलेला दिसून येत आहे. विवाह नोंदणी नगर परिषदेकडे पूर्ववत केल्यास रुग्णसेवेला वाव मिळेल, असे बोलले जात आहे.
१०० बेडच्या रुग्णालयाचा प्रस्ताव शासन दरबारी
सध्या ३० बेडचे असलेले उपजिल्हा रुग्णालय १०० बेडचे करण्याचा प्रस्ताव जानेवारीत जिल्हा रुग्णालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नव्या आकृतिबंधानुसार डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची पदे भरल्यास सिन्नरच्या आरोग्य व्यवस्थेला दिलासा मिळू शकतो. मात्र, तोपर्यंत नागरिकांना अपुऱ्या वैद्यकीय सुविधांवरच समाधान मानावे लागणार आहे.