

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
समृद्धी महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा सिन्नर पोलिसांनी पर्दाफाश करीत एका आरोपीला अटक केली असून ५ लाख ८ हजार ७९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी साकोर अली अब्दुल इलियास (२४, रा. उत्तर प्रदेश) हे दि. २९ मार्च रोजी रात्री त्यांच्या ट्रकने वापी ते हैदराबाद प्रवास करीत होते.
समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक ५८२.९ जवळ ट्रकचा गिअर बॉक्स विघडल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला लावून विश्रांती घेतली. दि. ३० मार्च रोजी पहाटे ४ च्या सुमारास त्यांना ट्रकखाली आवाज आल्याने पाहणी केली असता दोन अज्ञात व्यक्ती ट्रकमधून डिझेल चोरी करीत असल्याचे आढळले होते.
त्यावेळी आरोपींनी सुमारे २०० लिटर डिझेल चोरून अज्ञात चारचाकीतून पलायन केले. या गुन्ह्याचा तपास कररत असताना सिन्नर गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाल्यानंतर सिन्नर शिर्डी रोडवरील पाथरे शिवारात सापळा रचण्यात आला. यावेळी तीन संशयितांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले असून दोघे फरार झाले.
आरोपीकडून चोरीसाठी वापरलेली सिल्व्हर रंगाची इटिंगा कार (एमएच ०१, बीवाय ७४४५) तसेच १०० लिटर डिझेल असा एकूण ५ लाख ८ हजार ७९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
संशयितांची नावे : अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवनाथ शांताराम आव्हाड (२४, रा. जातेगाव टेंभी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. त्याने साथीदार वैभव उर्फ सोमा बाळासाहेब सुरवडे (रा. जामखेड, जि. अहमदनगर) व समाधान देवीदास राठोड (रा. कोपरगाव, जि. अ. नगर) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे.