

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
हे केवळ तालुक्याचे ठिकाण नसून, यादवकालीन वैभवाची जिवंत साक्ष असलेले ऐतिहासिक शहर आहे. इ.स. ९ व्या ते १३ व्या शतकादरम्यान यादव राजवटीच्या राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य वैभवाच्या असंख्य खुणा आजही येथे आढळतात. गोंदेश्वर मंदिर आणि ऐश्वर्येश्वर मंदिर यांसारख्या स्थापत्यकलेच्या अद्वितीय नमुन्यांमुळे सिन्नरला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
मात्र, सध्या याच वारशाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची खंत इतिहासप्रेमी व्यक्त करीत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये उमा-महेश्वर, चतुर्भुज विष्णू, गणपती तसेच इतर देवतांची शिल्पे, मंदिरांचे भनावशेष, आमलक, कळसाचे भाग, अलंकृत स्तंभ, कोरीव दगड उघड्यावर पडलेले दिसून येतात.
काही शिल्पे झाडाखाली, मोकळ्या जागेत, नाल्याजवळ पडून आहेत. या पुरातत्त्वीय ठेव्याकडे प्रशासन, समाजाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, या शिल्पांमधून यादवकालीन समाजजीवन, धर्म, स्थापत्यकला, कलावैभवाची महत्त्वपूर्ण माहिती मिळते. या वारशाचे नुकसान झाल्यास इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय कायमचा हरविण्याची भीती आहे.
अशा वस्तूंवर प्राचीन वस्तू तस्करांची नजर असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या शिल्पांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही तितकेच मोठे आहे. पूर्वजांची श्रद्धा, कलादृष्टी आणि सांस्कृतिक परंपरा यांचे हे प्रतीक असून, त्यांची उपेक्षा म्हणजे आपल्या सांस्कृतिक मुळांपासून दूर जाण्याचा धोका असल्याचे जाणकारांचे मत आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हा वारसा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. सिन्नरला 'यादवकालीन वारसा शहर' म्हणून विकसित केल्यास देशभरातील पर्यटकांना आकर्षित करता येईल. त्यामुळे स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते.
वारसा संग्रहालय उभारणीची मागणी
शहरात विखुरलेल्या शिल्पांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र 'वारसा संग्रहालय' किंवा 'शिल्प उद्यान' उभारण्याची मागणी पुढे येत आहे. या ठिकाणी सर्व शिल्पे सुरक्षित ठेवून त्यांची नोंदणी, जतन आणि अभ्यासाची व्यवस्था करता येऊ शकते. यासाठी नगरपालिका, महसूल प्रशासन, पुरातत्त्व विभाग, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
सिन्नरचा यादवकालीन वारसा हा केवळ स्थानिकांचा नसून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचा सांस्कृतिक ठेवा आहे. या अमूल्य वारशाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी नगर परिषद, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, असे आवाहन इतिहास अभ्यासक प्रा. जावेद शेख यांनी केले आहे.
- प्रा. जावेद शेख, सिन्नर (लेखक : गोंदेश्वर मंदिर दर्शन)