

सिन्नर : सिन्नर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच वाढली असून, थंडीच्या वातावरणातही राजकीय तापमान उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे शुक्रवारी (दि.१४) सिन्नरमध्ये दाखल झाले. पक्षातील इच्छुक उमेदवारांनी अंतिम निर्णयाची अपेक्षा धरली असतानाही माणिकरावांनी कोणालाच उमेदवारीचा 'ग्रीन सिग्नल' दिला नाही.
हरसुले येथील सिन्नर तालुका दूध संघाच्या कार्यालयात मंत्री कोकाटे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली. अनेक इच्छुक आपल्या नावाबाबत सकारात्मक संकेत मिळतील, या आशेने थेट धाव घेऊन गेले. एकामागून एक विविध प्रभागांतील इच्छुक कोकाटे यांच्याशी चर्चा करत होते. मात्र, चर्चेनंतर 'सब्र का फल मीठा होता है, अजून दोन दिवस थांबा. मात्र अर्ज भरून ठेवा', एवढेच कोकाटे यांनी सांगितले. दूध संघाच्या कार्यालयात सायंकाळी उशिरापर्यंत कार्यकर्ते देखील थांबून होते. काही प्रभागांचा औपचारिक आढावा कोकाटे यांनी यावेळी घेतल्याचे समजते.
वेळ कमी असताना इच्छुकांची घालमेल
आधीच वेळ निघून जात असताना उमेदवारीवर स्पष्ट दिशा न मिळाल्यामुळे पक्षातील इच्छुकांची घालमेल तीव्र झाली आहे. निर्णयाची प्रतीक्षा आणखी दोन दिवस वाढल्याने तर्क-वितर्वांना ऊत आला आहे. आता मंत्री कोकाटे यांचा नगराध्यक्ष पदाचा अंतिम निर्णय कोणाच्या पारड्यात जाणार याकडे संपूर्ण सिन्नरचे लक्ष लागले आहे.
उमेदवारीचा अंतिम होणार सोमवारी
उमेदवारी जाहीर करण्याबाबतची स्पष्टता पुन्हा मागे ढकलली गेली आहे. मंत्री कोकाटे यांनी इच्छुकांना अर्ज मात्र तातडीने दाखल करण्याचे सूचित केले असून, उमेदवारीवरचा अंतिम निर्णय दोन दिवसांत होईल, असेही सांगितले. अर्ज दाखल करण्याची केवळ दोन दिवसांची मुदत उरलेली असताना नेत्यांकडून अधिकृत निर्णय न मिळाल्याने कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.