सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात दर रविवारी भरत असलेल्या जनावरे बाजारामध्ये इअर टॅगिंग बंधनकारक करण्याबाबत शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी रविवार (दि. १६) पासून सुरू होणार आहे. याबाबत बाजार समितीने नुकताच निर्णय घेतला.
नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच शेजारील पुणे जिल्ह्यातील शेतकरी व व्यापारी मोठी जनावरे (बैल) खरेदी-विक्रीसाठी सिन्नरच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर येतात. महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २७फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व पशुधनाला ईअर टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यातील पशुधनाची राज्यांतर्गत खरेदी-विक्री व वाहतूक करताना देखील इअर टॅगिंगची नोंद झाल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी आरोग्य प्रमाणपत्र, तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत. बाजार समिती आवारात इअर टॅगिंग केलेल्या जनावरांची खरेदी-विक्री झाल्यानंतर वरील दोन्ही प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई
इअर टॅग नसलेल्या कोणत्याही जनावरास खरेदी-विक्रीची पावती दिली जाणार नसून, अशा पशुधनाची वाहतूक करणे नियमबाह्य मानले जाईल. नियम मोडल्यास पशुधनाचे मालक तसेच वाहतूकदार यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशारा बाजार समितीतर्फे देण्यात आला आहे.
शेतकरी व व्यापाऱ्यांनी जनावरे बाजारात आणण्यापूर्वी गावपातळीवर इअर टॅगिंग करून घ्यावे. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक जनावराची इअर टॅग तपासणी केली जाणार असून, इअर टॅग नसलेले पशुधन बाजारात प्रवेश करू शकणार नाही. त्याचा खरेदी-विक्री व्यवहार होणार नाही.
श्रीकृष्ण घुमरे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर