

Sinnar Municipal Council Election
सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर पंचवार्षिक नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस उलटले तरी अद्याप एकाही उमेदवाराने नामनिर्देशन दाखल केलेले नाही. बुधवारी (दि. १३) सलग तिसऱ्या दिवशीही अर्जाचा आकडा शून्यावरच असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.
स्थानिक राजकीय चाँनुसार, प्रमुख पक्षांकडील आंतरिक समीकरणे आणि संभाव्य आघाड्यांबाबतची अनिश्चितता यामुळे उमेदवार अर्ज दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत अर्ज दाखल करण्याची गती वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शंभर मीटर परिसरात बॅरिकेड्स
सिन्नर नगर परिषद कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. बॅरिकेड्स लावण्यात आल्याने चारचाकी वाहनांना खडकपुरा, पंचायत समितीमार्गे वळसा घेऊन पुढे जावे लागत आहे. उमेदवार शक्तिप्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी येऊ शकतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे नगर परिषदेकडून खबरदारी म्हणून ही उपायोजना करण्यात आल्याचे दिसून आले.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
मात्र अर्ज दाखल करण्यास उमेदवारांचा प्रतिसाद न मिळाल्याने शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवार निश्चित न झाल्याने कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार गोंधळात असल्याचे बोलले जात आहे.