

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
औद्योगिक वसाहतीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असून, गेल्या सहा महिन्यांमध्ये घडलेल्या चोरीच्या सुमारे ८० टक्के घटनांचा छडा लावण्यात यश आले आहे. वसाहतीतील चोरी, चोरट्यांच्या टोळ्या तसेच अवैध व्यवसायांचे पूर्णपणे उच्चाटन करण्यात येईल, असे आश्वासन एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिले.
सिन्नर इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा) आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी 'सिमा'चे अध्यक्ष सुकुमार नायर होते. यावेळी सिमाचे उपाध्यक्ष विठ्ठल जपे, सचिव बबन वाजे, विश्वस्त मारुती कुलकर्णी, कोषाध्यक्ष राहुल नवले, अरुण चव्हाणके, सुधीर जोशी, मुकेश देशमुख, सतीश नेहे, प्रमोद कुटे, अरुण खालकर, शशिकांत नवले, शरद टर्ले, सुधीर बडगुजर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने आदींसह उद्योजक उपस्थित होते.
बबन वाजे यांनी प्रास्ताविकात औद्योगिक वसाहतीतील समस्या मांडल्या. वारंवार होणाऱ्या चोऱ्या, पगाराच्या दिवशी घडणाऱ्या लुटीच्या घटना, गांजा व दारू विक्रीचे वाढते अवैध धंदे, मोबाइल चोरट्यांचा वाढता त्रास तसेच बाहेरील व्यक्तींकडून जबरदस्तीने वर्गणी मागितली जात असल्यामुळे उद्योजकांमध्ये तसेच कामगारांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीत नियमित पोलिस गस्त वाढवावी त्याबरोबरच स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
अनधिकृत टपऱ्या, गांजा व दारू विक्रेते रडारवर
पोलिस निरीक्षक जाधव यांनी अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, यासाठी एमआयडीसी प्रशासनाशी समन्वय साधला जाणार आहे. गांजा व दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
'जिंदाल'च्या सहकार्याने लवकरच पोलिस चौकी
वसाहतीच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून, जिंदाल कंपनीच्या सहकार्याने चौकी उभारण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. उद्योजकांना त्रास देणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले