

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील चास येथील त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत २०१० ते २०२५ या कालावधीत संचालक मंडळातील सदस्यांनी संगनमत करून सभासदांची फसवणूक व अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.
ठेवीदारांच्या हितास वाधा निर्माण होईल अशा प्रकारे एकूण २ कोटी ३१ लाख १५ हजार ३३० रुपये रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामुळे सिन्नरच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत लेखा परीक्षक रुस्तम सारंगधर कपाटे (६१, रा. कानडी मळा, मुरलीधरनगर, सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित संचालक मंडळातील २१ आजी-माजी सदस्यांविरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सरोवर करीत असून सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या आर्थिक गैरव्यवहारामुळे पतसंस्थेच्या ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सहकार क्षेत्रात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील तपासात आणखी तपशील समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
२०१० ते २०२३ या कालावधीतील संचालक मंडळातील आरोपी चेअरमन जगन्नाथ वामन सहाणे (रा. प्रवरा कॉर्नर अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) व व्हा. चेअरमन मच्छिंद्र मुरलीधर खैरनार तसेच संचालक अण्णासाहेब सोपान खैरनार, रघुनाथ वामन सहाणे, रामदास रंगनाथ भाबड, सुदाम श्रीहरी सहाणे, सूर्यभान बाबूराव देशमुख, गुलाब गंगागीर गोसावी, दादा भाऊराव गायकवाड,
संचालिका कमळाबाई बाळासाहेब गडाख (सर्व रा. चास, ता. सिन्नर) तसेच संचालिका कांता भागवत कातोरे (रा. मालदाड रोड, ता. संगमनेर), व्यवस्थापक सुरेश तुकाराम जगधने (रा. गौरवनी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर). २०२३ ते २०२५ या कालावधीतील संचालक मंडळातील आरोपी चेअरमन शिवाजी विठोबा खैरनार, व्हा. चेअरमन नंदकुमार हरिश्चंद्र देशमुख, संचालक सोमनाथ माधव भावड, उत्तमराव कारभारी, राजेंद्र भागीनाथ खैरनार, पोपट सोपान खैरनार, संचालिका मंगल बाळासाहेब देशमुख, कल्पना उत्तम गायकवाड (सर्व रा. चास, ता. सिन्नर, जि. नाशिक) तसेच संचालक रामनाथ हरी लोहकरे (रा. कासारवाडी, ता. सिन्नर).
...म्हणून फसवणुकीचा गुन्हा
पतसंस्थांना स्वनिधी इतक्या रकमेच्या ठेवी स्वीकारण्याचा अधिकार असतो. त्रिमूर्ती पतसंस्थेकडे १४ लाख ७९ हजारांचा स्वनिधी असताना, त्यांनी सुमारे दोन कोटींच्या घरात ठेवी स्वीकारून कायद्याचे उल्लंघन केले असून, सभासदांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला असल्याचे लेखा परीक्षक कपाटे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. यातील बहुतांश ठेवी कर्ज स्वरूपात वाटप केलेल्या असून, संस्थेला ठेव स्वरूपातील ही रक्कम ठेवीदारांना परत करावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
२३ लाखांचे तारण सोनेही गायब
संस्थेला सोने तारणाची परवानगी होती. त्यानुसार संस्थेने ३० ते ३२ लाखांचे सोने तारण कर्ज वाटप केलेले आहे. तथापि, लेखा परीक्षणात यातील व्याजाच्या रकमेसह जवळपास २३ लाखांचे तारण घेतलेले सोने आढळलेले नाही. त्याचे काय झाले? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे.