

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
कन्यारत्न प्राप्तीचा आनंद साजरा करण्यासाठी अवघ्या तीन दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आलेल्या जवानाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने तालुक्यातील खंबाळेसह आहे. प्रवीण भाऊसाहेब आव्हाड (२७) असे मृत जवानाचे नाव आहे.
प्रवीण आव्हाड परिसरात शोककळा पसरली प्रवीण आव्हाड हे जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात भारतीय सैन्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. १३ दिवसांपूर्वी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते. चिमुकलीला पाहण्यासाठी आणि कुटुंबीयांसमवेत आनंदाचे क्षण घालविण्यासाठी ते काही दिवसांच्या रजेवर खंबाळे येथे गावी आले होते.
दरम्यान, कामानिमित्त नांदूरशिंगोटे येथे गेलेले प्रवीण आव्हाड हे रविवारी (दि.१४) रात्री मोटारसायकलने घरी परतत असताना नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी पाटी परिसरात रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने प्रवीण यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. खंबाळे येथील स्मशानभूमीत प्रवीण आव्हाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी लेफ्टनंट कर्नल गौतम, नायब सुभेदार जसवीर सिंग यांच्यासह पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पत्नी पूजा, आई जिजाबाई व वडील भाऊसाहेब आव्हाड यांनी अश्रुपूर्ण वातावरणात पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अखेरचा निरोप दिला. सैन्याच्या जवानांनी मानवंदना दिल्यानंतर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
आठ वर्षापूर्वी देशसेवेत; दोन वर्षापूर्वी विवाहबंधनात
कन्यारत्नाच्या आगमनाचा आनंद साजरा करणाऱ्या आव्हाड कुटुंबावर या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जवानाच्या अकाली निधनामुळे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आठ वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या प्रवीण यांचा दोन वर्षांपूर्वी पूजा यांच्यासोबत विवाह झाला होता. संसारवेलीवर कळी उमलल्याचा आनंद औटघटकेचा ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.