

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत खतांचे चार नमुने अप्रमाणित आढळून आल्याने संबंधित चार कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच या खतांच्या विक्रीवर तत्काळ प्रतिबंध घालण्यात आल्यामुळे कृषी निविष्ठा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी तालुका कृषी कार्यालय व पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार अहिरे आणि तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी ज्ञानेश्वर दुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी निविष्ठा केंद्रांमधून नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. कृषी विभागाला यंदा तालुक्यातून खतांचे 138, बियाणांचे 162 आणि कीटकनाशकांचे 20 नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
त्यापैकी आतापर्यंत खतांचे 15 आणि बियाणांचे 27 नमुने संकलित करण्यात आले आहेत. यातील खतांचे 12 आणि बियाणांचे 20 नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात खतांचे चार नमुने अप्रमाणित आढळले असून, त्यांची गुणवत्ता निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे या अप्रमाणित नमुन्यांमध्ये डीएपी खतांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. खते, बियाणे आणि कीटकनाशकांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने कठोर भूमिका घेतल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. सुमारे १५ दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत कृषी निविष्ठा विक्रेत्यांना गुणवत्तेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार खरीप पेरणीपूर्वीच मोठ्या प्रमाणावर नमुने गोळा करून त्यांची प्रयोगशाळा स्तरावर तपासणी केली जात आहे. अद्याप काही नमुन्यांचे अहवाल येणे बाकी असून त्याकडे शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे लक्ष लागून आहे. त्यानंतरही कृषी विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
चार कारखान्यांवर कारवाई
अप्रमाणित खतांचे नमुने आढळून आलेल्या चार कारखान्यांना कृषी विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. तसेच पुढील आदेशापर्यंत त्यांच्या संबंधित खतांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईमुळे कृषी निविष्ठा क्षेत्रात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात आणि फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी खरीपपूर्व तपासणी मोहीम सुरू आहे. अप्रमाणित नमुने आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
- कृषी विभाग