

ठळक मुद्दे
रस्ते, पाणी, वीज सर्व सुविधांचा बोंब असल्याचा आरोप
बैठका, पत्रव्यवहाराचा उपयोग होत नसल्याचा साधूंचा दावा
साधु-महंतांची भेट घेण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना साधुंचे खडे बोल
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्व नियोजनासाठी आखाड्यांच्या साधु-महंतांची भेट घेण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना साधुंनी खडे बोल सुनवाले व पुढील १५ दिवासांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात न झाल्यास साधुंना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा दिला.
शुक्रवार (दि. २९) पूर्व नियोजनाप्रमाणे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी प्रणव दत्त, त्र्यंबक नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, तहसीलदार श्वेता संचेती यांच्यासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाडा, आनंद आखाडा, आवाहन आखाडा, जुना आखाडा यासह सर्व प्रमुख आखाड्यांना भेट दिली. दुपारच्या सत्रात अग्नी आखाडा, निर्मल आखाडा, अटल आखाडा, जुना उदासीन, बडा उदासीन अशा १० आखाड्यांतील साधूंशी चर्चा केली.
निलपर्वत येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील बैठकीत साधूंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर तक्रारी मांडल्या. यापूर्वी झालेल्या बैठकांचे काय झाले? अर्ज विनंत्या केल्या त्याचे काय केले? या सारख्या प्रश्नांची सरबत्ती केली. महामंत्री हरीगिरी महाराज शासनाच्या वेळकाढूपणाने नाराज असल्याचे व बैठकांचा काहीही उपयोग होत नसल्याने ते या बैठकीला उपस्थित नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. महंत हरिगिरी महाराज यांनी शासनाकडे सिंहस्थ कुंभमेळयाच्या बाबत काही प्रस्ताव व सूचना केल्या होत्या, त्याबाबतची विचारणा जुना आखाड्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा नीलपर्वत पीठाधीश्वर महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांनी केली.
सिंहस्थाच्या कामासाठी नदी प्रवाहीत करणे, घाट बांधकाम, रस्ते, पाणी, वीज आणि शौचालय आदी सुविधा पुरवण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते. मात्र आजतागायत काम सुरू न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उज्जैन येथे कुंभमेळ्याला अवकाश असताना तेथे तयारी पूर्णत्वास आली आहे याकडे लक्ष वेधले. सिंहस्थ कामांना १५ दिवसांत प्रारंभ झाला नाही तर साधु रस्त्यावर उतरतील आणि मोर्चा काढतील असा इशारा यावेळी त्यांनी शासनाला दिला आहे. साधुंनी केलेल्या प्रश्नांचा भडीमार पाहून उपस्थित अधिकारी आवक झाले.
सेक्रेटरी मनिष गिरी यांनी नाशिक त्र्यंबक रस्त्याने आपण आला असाला तर आपल्याला प्रवास करताना खड्डे जाणवले नाहीत का? असा सवाल केला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यासह त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. शहरात आणि नीलपर्वत येथे सार्वजनिक शौचालय नाही, भाविकांना विशेषतः महिलांना कुचंबणा सहन करावी लागते, वीजेची व पाण्याची समस्या तिव्र आहे. निलपर्वत मागच्या काही दिवसांपासून अंधारात आहे. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, याकडे लक्ष वेधले. सेक्रेटरी दीपक गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला, दुरध्वनीवर चर्चा केली. मात्र त्याबाबत दखल घेतली नाही अशी तक्रार केली. दरम्यान जुना आखाड्याचे धव्जा आणि देवता यांचे ठिकाण येथून दूर आहे. तेथील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे, याबाबत माहिती दिली. नगर परिषद प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली.सिंहस्थ कुंभमेळा आटोपला की १२ वर्ष मुलभूत सुविधांच्या बाबत दुर्लक्ष केले जाते, अशी खंत व्यक्त केली. या भेटी दरम्यान काही आखाड्यांनी ते कुशावर्तावर स्नान करतील अशी स्पष्ट भूमिका घेतली. शासनाचे त्र्यंबकेश्वरकडे लक्ष नसल्याची खंत साधू-महंतांनी व्यक्त केली. यावेळी पोलिस उप अधीक्षक वासुदेव देसले, निरीक्षक महेश कुलकर्णी, सिंहस्थ कक्षाचे निरीक्षक बिपीन शेवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वैभव घुगे, शहर अभियंता स्वप्नील काकड यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.