

नाशिक : प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यानंतर तेथील मार्केट २५ ते ३० टक्क्यांनी वाढले. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा देखील नाशिकच्या बाजारपेठेसाठी सकारात्मक ठरणार आहे. विशेषत: रिअल इस्टेट क्षेत्राला सिंहस्थ बुस्ट देणारा ठरेल, असे प्रतिपादन कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी केले.
गंगापूर रोड येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर नरेडकोतर्फे आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिक महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त जलज शर्मा, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बनसोड, बीएसएनएलचे व्यवस्थापक सारंग मानवीकर, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विजय काकतकर, नरेडको अध्यक्ष सुनील गवादे, होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, विकास काला, राजू शहा, विकास शहा, उदय शहा, मनोज टिबरीवाल, अभय नेरकर, दीपक चंदे, मौलिक दवे, हितेश ठक्कर उपस्थित होते. आयुक्त शेखर सिंग म्हणाले, नाशिक हे वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे.
मला आणि माझ्या पत्नीला या शहराचे हवामान, शहराची ओळख खूप भावली आहे. येथील पर्यटन, धार्मिकता, औद्योगिकता, कनेक्टीव्हीटी या शहराला विकासाच्या वाटेवर घेऊन जात आहे. नाशिक महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी आहे. त्यामुळे या शहराचे वेगळेपण जपण्याची आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. रिंगरोड नाशिकसाठी गेमचेंजर ठरणार आहे. शहराचा रिंगरोड साकारण्याची हीच योग्य वेळ आहे. ग्रीनफिल्ड परिसरासाठी रिंगरोड महत्त्वाचा ठरणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकसाठी सर्वार्थाने महत्त्वाचा आहे. रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बुस्ट देणारा ठरणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हे शहर आपलेसे कसे वाटेल यासाठी नरेडको, क्रेडाई यांच्यासह सर्वांच्याच प्रयत्नांची गरज असल्याचेही ते म्हणाले.
आयुक्त जलज शर्मा म्हणाले, नाशिकमध्ये घर घेण्यास लोक इच्छुक आहेत. होमेथॉन त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. परवडणाऱ्या घरांपासून ते लक्झरी अपार्टमेंट असे सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. नाशिकचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी एनएमआरडीच्या माध्यमातून चांगल्या आणि टिकाऊ पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त लीना बनसोड यांनी नाशिकची प्रगती बघून आनंद होतो. मात्र, पर्यावरणपूरक विकास कसा होईल, यादृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. बीएसएनएलचे व्यवस्थापक सारंग मानवीकर यांनी नाशिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले. डॉ. काकतकर यांनी नाशिकमध्ये मोठा बदल होत असून नव्या दर्जाच्या इमारती उभारल्या जात असल्याने नाशिकचे पूर्ण रुपच बदलल्याचे मी गेल्या ४८ वर्षांपासून बघत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक सुनील गवादे यांनी केले. होमेथॉनचा उद्देश जयेश ठक्कर यांनी सांगितला. सूत्रसंचालन प्रसन्न जायखेडकर यांनी केले. आभार शंतनू देशपांडे यांनी मानले.
झाडे लावा, पण जगवा
नरेडको अध्यक्ष सुनील गवादे यांनी प्रदर्शनाला जेवढे लोक भेट देणार तेवढेच झाडे नरेडकोच्या माध्यमातून लावले जाणार असल्याचे जाहीर केले. विविध वृक्ष संवर्धन संस्थांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार झाडे लावण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त शेखर सिंग यांनी, नरेडकोच्या या उपक्रमाचे कौतुक केले. झाडे लावाल तर ते जगवण्याचीही जबाबदारी घ्या, असेही सांगितले. कन्स्ट्रक्शनमुळे नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असेल तर त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी जयेश ठक्कर यांनी नरेडकोच्या माध्यमातून लावली जाणारे प्रत्येक झाड जगवले जाणार असल्याचे आश्वासित केले. आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांच्या मदतीने झाडांची देखभाल केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.