

नाशिक : परवडणाऱ्या घरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये घरांच्या किंमती अगोदरच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असून, वाढीव रेडीरेकनरच्या दरांमुळे त्यात भर पडली आहे. वर्षाच्या प्रारंभी जाहीर करण्यात आलेल्या रेडरेकनरच्या दरात नाशिकमध्ये सरासरी ८.८० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हे दर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याने घरांच्या किंमती सरासरी पाच टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज आहे.
नाशिक झपाट्याने वाढत असून, शहराच्या कक्षा चहुबाजुने विस्तारत आहेत. अगोदरच इंधन दरवाढीचा परिणाम बांधकाम साहित्यांच्या किंमतीवर झाला आहे. त्यामुळे घरांच्या किंमतीत यापूर्वीच वाढविण्यात आल्या आहेत. अशात रेडिरेकनरचे वाढीव दर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याने, घरांच्या किंमती वाढणार आहेत. वास्तविक रेडीरेकनरच्या वाढीव दर मुद्रांक शुल्कावर परिणाम करीत असतात. परंतु याचा परिणाम महापालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या इतरही शुल्कांवर होत असतो. वाढीव रेडीरेकनरमुळे महापालिकेचे विकास शुल्क, लेबर सेस महागणार आहे. त्यामुळे याचा देखील घरांच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. दरम्यान, घरांच्या किंमती १ एप्रिलपासून महागणार असल्याने, तत्पूर्वी घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जुन्या किंमतींचा लाभ घेता येणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गृह खरेदी शुभ मानली जात असल्याने, मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून प्रकल्पस्थळी भेटी दिल्या जात आहेत.
अनेकांकडून फ्लॅट, रो-हाऊस, प्लॉटचे बुकींग केले जात असून, पुढील काही दिवसात व्यवहार पूर्ण केल्यास त्याचा लाभ ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी गुढीपाडव्या अगोदर व्यवहार पूर्ण करून कमी किंमतीत घर घरेदी करण्याची संधी साधावी, असे आवाहन बांधकाम व्यावसायिकांकडून केले जात आहे.
नाशिकमध्ये परवडणाऱ्या घरांच्या व्याख्या आता बदलली आहे. मागील पाच वर्षांपूर्वी अवघ्या १२ ते १५ लाखात मिळणारा फ्लॅट आता २० लाखांवर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न आता दुरावले आहे. काही बांधकाम व्यावसायिकांकडून १५ लाखात फ्लॅट उपलब्ध करून दिला जात असला तरी, हे प्रकल्प शहरापासून बऱ्याच अंतरावर आहेत.
नाशिकमध्ये गंगापूर रोड, कॉलेज रोड यासारख्या भागात अगोदरच घरांच्या किंमती जास्त आहेत. अशात नाशिकमध्ये रेडिरेकनरचे दर वाढविले जाऊ नये, अशी आमची मागणी होती. मात्र, दर वाढविल्याने, त्याचा परिणाम मुद्रांक शुल्कांवर होईलच, याशिवाय महापालिकेचे विकास शुल्क, लेबर सेस हे देखील वाढणार आहे. परिणामी घरांच्या किंमती वाढतील.
सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको, नाशिक.