

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू- महंत व भाविकांना मूलभूत सेवा- सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून तपोवन येथे तात्पुरत्या शौचालयांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात सुमारे १९ विविध एजन्सींनी सहभाग नोंदवला आणि त्यांनी आपल्या शौचालय प्रकारांचे सादरीकरण करून, कुंभमेळ्यासारख्या भव्य धार्मिक मेळ्याच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम सुविधा मांडल्या.
या प्रात्यक्षिकात एफआरपी शौचालये, स्टील शौचालये, उघडी व बंद युरिनल्स तसेच कापडी शौचालयांचेही सादरीकरण करण्यात आले. या पर्यायांची स्वच्छता, देखभाल, वाहतुकीची सोय आणि गर्दीच्या वेळी उपयुक्तता यांच्या आधारे तपासणी करण्यात आली. या प्रत्यक्षिकांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, प्रशांत पगार, उपअभियंता समीर रकटे तसेच कुंभमेळा नियोजनाशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते. त्यांनी सर्व मॉडेल्सचे निरीक्षण करून त्यांच्या व्यवहार्यतेवर सकारात्मक चर्चा केली. या उपक्रमातून नाशिक महापालिकेचा कुंभमेळ्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि कार्यक्षम शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार स्पष्टपणे दिसून आला. लाखो भाविकांच्या सेवेसाठी हा टप्पा महत्त्वपूर्ण ठरणार असून, अंतिम निवडीनंतर पुढील नियोजन निश्चित केले जाणार आहे.