

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर संस्थेने तयार केलेला 'क्राउड मॅनेजमेंट' आराखडा नुकत्याच झालेल्या बैठकीत सादर केला. विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभव लक्षात घेऊन नाशिकमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, कोणतीही अनुचित घटना घडू नये व भाविकांचा प्रवास आणि स्नान प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. गर्दी व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मार्गदर्शक फलक, मार्ग नियंत्रण तसेच आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद यावर भर देण्यात आला आहे.
राज्य शासनाने आयआयएम नागपूरसमवेत विशेष करार केला असून, त्या अंतर्गत कुंभमेळ्यातील गर्दी नियोजनासाठी त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयआयएमच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत चित्रफितीद्वारे प्राथमिक आराखडा सादर केला, ज्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पोलिस प्रशासन, महावितरण कंपनी व आपत्कालीन विभागांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. डॉ. गेडाम यांनी सादरीकरणातील मुख्य मुद्द्यांवर सखोल माहिती संकलित करण्याचे व त्यावर आधारित स्थानिक स्तरावरील विभागांनी स्वतःचे नियोजन तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. या उपक्रमामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांचे सुरळीत आगमन, स्नान व निर्गमन सुनिश्चित होण्याची अपेक्षा आहे.