

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, याच अनुषगांने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कुंभमेळा प्राधिकरणाचे कार्यालय कार्यरत झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनावर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रविण गेडाम यांच्या नावाचा फलक लावण्यात आला असून, याठिकाणी त्यांनी बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. गुरुवार (दि.११) विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्तांनी जि. प. मुख्यालयात येऊन इमारतीची पाहणी केली.
दर बारा वर्षाने भरत असलेला सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी सर्व स्तरांवर नियोजनात्मक तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तीन महिन्यांपूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली असून, विभागीय महसूल आयुक्त डॉ. गेडाम यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र, डॉ. गेडाम यांचे कार्यालय हे नाशिकरोड येथे असल्याने नियमित बैठका घेण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी कार्यालयाची आवश्यकता होती. त्यासाठी जागेचा शोध होता. त्यावर जिल्हा परिषदेचे स्थलांतर होणार असल्याने मुख्यालयाची इमारत घेण्याबाबत निश्चित झाले होते. प्राधिकरण कार्यालय सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे स्थलांतरीत होण्याची प्रतीक्षा होती. मात्र, नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असल्याने हे स्थलांतर लांबणीवर पडले. अखेर, प्राधिकरणाने जि.प. मुख्यालयात कार्यालय सुरू केले आहे. अध्यक्ष दालनासह पदाधिका-यांचे दालनांमध्ये हे कार्यालय सुरू झाले आहे.
प्राधिकरणाचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी दर महिन्याला बैठका आवश्यक असतात. मात्र, जिल्हा परिषद नुतन इमारतीत स्थलांतरित झाल्याशिवाय प्राधिकरणाला कार्यालय ताब्यात देता येणार नाही. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एबीबी सर्कलजवळ सहा मजली इमारत उभारण्यात येत असून, तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन मजल्यांचे ९० टक्के काम प्रगतीपथावर आहे.
जिल्हा परिषद कार्यालाय स्थलांतर प्रक्रियेत असून, अजून कागदोपत्री अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाच्या बैठका अत्यावश्यक आहेत. त्यामुळे अध्यक्ष-पदाधिकारी दालनात प्राधिकरणाचे कार्यालयाला जागा दिली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत लवकरात लवकर स्थलांतर करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू करण्याते निर्देश दिले आहे.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक