

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ग्रीन बॉण्डमधून पंचवटीसह सातपूर, नाशिक पश्चिम विभागाकरीता २२५ कोटींची मलनिस्सारण योजना राबविली जाणार आहे. या विभागात आगामी ३० वर्षांतील लोकसंख्येचा विचार करून अधिक क्षमतेच्या ११० किलोमीटर लांबीच्या नव्या मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच शहराचा दिवसेंदिवस वाढता विस्तार लक्षात घेता गावठाणातील जुन्या मलवाहिका बदलण्याचा तसेच नव्याने विकसित झालेल्या भागात नवीन मलवाहिका टाकण्याचा निर्णय महापालिकेला घेतला आहे. सद्यस्थितीत सातपूर, पंचवटी व पश्चिम या तिन्ही विभागातील मलनिस्सारण वाहिन्या अनेक ठिकाणी एकमेकांना जोडलेल्या नाहीत. त्यामुळे त्यातून वाहून नेले जाणारे सांडपाणी हे गोदावरी नदीसह नैसर्गिक नाले आणि नंदिनी नदीमध्ये मिसळले जाते. यामुळे जलप्रदुषण निर्माण होत आहे. सिंहस्थापूर्वी गोदावरी नदी प्रदुषणमुक्त व्हावी, अशी मागणी साधु महंतांबरोबरच भाविकांकडून केली जात आहे. यामुळे राज्य शासनासह महापालिका प्रशासनाने गोदावरी नदीमधील प्रदुषण दूर करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
मलनिस्सारण योजनेतील कामांसाठी ग्रीन बॉण्डमधून उभारला जाणारा निधी वापरला जाणार आहे. रामकुंड परिसरात मलवाहिका आणि पावसाळी वाहिन्या स्वतंत्र करून मलवाहिका गणेशवाडीतील पंपींग स्टेशनला जोडल्या जाणार आहे.
रवींद्र धारणकर, अधिक्षक अभियंता, मनपा
सिंहस्थाबरोबरच तिन्ही विभागातील नागरी वसाहतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे तेथील सांडपाणी वाहून नेण्यावर मर्यादा येत असल्याने मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याशिवाय जुन्या व जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलून त्याठिकाणी मोठ्या आकाराच्या वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या कामासाठी ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या २०० कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागाचे अधिक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.
निविदा प्रक्रिया राबविणार
यासंदर्भातील प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या तांत्रिक मान्यतेने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, येत्या ६ तारखेला निविदा पूर्व बैठक होणार आहे. २० नोव्हेंबरला निविदा दाखल करण्याची मुदत आहे. २१ नोव्हेंबरला निविदा उघडल्या जाऊन पात्र मक्तेदाराची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.