Simhastha Kumbh Mela : ‘बॉण्ड’ उभारणीसाठी महापालिकेची पतनिश्चिती
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळांतर्गत हाती घेतल्या जाणार्या कामांसाठी निधी उभारण्याकरिता 200 कोटींचे म्युनिसिपल बॉण्ड, 200 कोटींचे ग्रीन बॉण्ड तसेच 100 कोटींचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यासाठी पतनिश्चिती अर्थात रेटिंग जाहीर करणे बंधनकारक असल्याने महापालिकेने क्रिसील व इंडिया रेटिंग या वित्तीय संस्थांमार्फत रेटिंग करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नाशिकमध्ये येत्या 2026-27 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थासाठी महापालिकेने 15 हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला असला तरी अद्याप या आराखड्याला शासनाच्या उच्चस्तरीय शिखर समितीची मंजुरी मिळू शकलेली नाही. कुंभमेळ्याला आता दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला असताना राज्य विधिमंडळाच्या गत पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये जेमतेम एक हजार कोटींचा निधी सिंहस्थासाठी मंजूर केला गेला.
या निधीच्या आधारे सिंहस्थ प्राधिकरणामार्फत सुमारे पाच हजार कोटींची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात असून, यापैकी 1200 कोटींची कामे महापालिकेमार्फत केली जाणार आहेत. सिंहस्थासाठी शासनाकडून निधी मिळणार असला तरी त्यात महापालिकेलादेखील सुमारे 30 टक्के हिस्सा स्वनिधीतून द्यावा लागणार आहे.
यासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात 425 कोटींची तरतूद केली असली तरी संपूर्ण सिंहस्थ कामांसाठी हा निधी पर्याप्त नाही. त्यामुळे 200 कोटी ग्रीन बॉण्डद्वारे तर 200 कोटी म्युनिसिपल बॉण्डद्वारे उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्याशिवाय 100 कोटी अर्बन चॅलेंज फंडातून उभारले जात आहेत. त्यासाठी दोन वित्तीय संस्थांकडून पतनिश्चिती करणे अर्थात आर्थिक परिस्थितीचे रेटिंग जाहीर करणे बंधनकारक होते.
पुढील आठवड्यात अहवाल
महापालिकेने क्रिसील व इंडिया रेटिंग या वित्तीय संस्थांवर पतनिश्चितीची जबाबदारी सोपविली आहे. या संस्थांमार्फत पुढील आठवड्यात महापालिकेला पतनिश्चितीचा अहवाल सादर केला जाईल. महापालिकेने यापूर्वी 2015-16च्या सिंहस्थात कर्ज उभारणीसाठी क्रिसीलमार्फत रेटिंंग केले होते. त्यावेळी ‘अ-’ दर्जा महापालिकेला मिळाला होता.

