

नाशिक : नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी सूक्ष्म नियोजन करावे. आवश्यक तेथे फिरते आणि शीघ्र प्रतिसाद देणा-या आरोग्य पथकांचे नियोजन करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (दि. 9) दुपारी सिंहस्थ कुंभमेळा कामांबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. गेडाम म्हणाले की, कुंभमेळ्यानिमित्त देश-विदेशातून भाविक येतील. त्यांच्यासाठी अद्ययावत, दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. त्याबरोबरच रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, अतिदक्षता कक्ष कार्यान्वित ठेवावा. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी आणि अन्य मनुष्यबळ गुणवत्तापूर्ण असावे.
साधूग्राम, घाट परिसरात दोन्ही बाजूला, वाहनतळ, रेल्वे स्थानक, बसस्थानक, आखाड्याच्या ठिकाणी, पर्यटनस्थळांच्या तसेच पोलिस, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी आदी अत्यावश्यक सेवेच्या कर्मचा-यांच्या निवासाच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच पोलिसांच्या मदतीने रुग्णालयांपर्यंतचा मार्ग निश्चित करावा. याबरोबरच परिसरातील शासकीय, निमशासकीय, खासगी रुग्णालये, तेथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा, उपलब्ध यंत्रसामग्री यांचीही माहिती संकलित करून ठेवावी. त्र्यंबकेश्वर येथेही याच प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीस प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील (ग्रामीण), जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, बी. डी. पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. योगेश चित्ते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नियोजनाचे झाले सादरीकरण
कुंभमेळा आयुक्त सिंह यांनी कुंभमेळा कालावधीत द्यावयाच्या आरोग्य सेवेबाबत मार्गदर्शन केले. मनपा आयुक्त खत्री यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. चित्ते यांनी जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची सविस्तर माहिती दिली. तसेच कुंभमेळ्याच्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले.