

नाशिक : सीमेवर सैनिक आणि सीमेपासून देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. पोलिसांशिवाय देश चालूच शकत नाही. त्यामुळे जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असलेला सिंहस्थ कुंभमेळा पोलिसांशिवाय निर्विघ्न पार पडू शकणार नाही, अशा शब्दांत साधूु- महंतांनी पोलिसांवर विश्वास दर्शविला. तसेच नाशिक पोलिस महाराष्ट्रात क्रमांक एकवर असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यात ते कुठेही कमी पडणार नाहीत, याबाबतचा आम्हास विश्वास असल्याचेही साधू, महंतांनी स्पष्ट केले.
दैनिक 'पुढारी'तर्फे त्र्यंबकेश्वर रोडवरील फ्रावशी अकॅडमीच्या सभागृहात आयोजित 'महाकुंभ नेतृत्व अन् खाकी सन्मान- २०२५' या विशेष सोहळ्यानिमित्त दैनिक 'पुढारी'ने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलिस आणि साधू- महंतांचा उत्तम संगम जुळवून आणला. अत्यंत आगळ्यावेगळ्या या सन्मान सोहळ्यात साधू- महंतांच्या आशिर्वादाने प्रशासन आणि पोलिस दलातील कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पोलिसांच्या शौर्याचे कौतुक करताना साधू- महंतांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पोलिसांकडून साधूंसह येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या सुरक्षेची अपेक्षा व्यक्त केली गेली. तर पोलिसांनी देखील साधू -महंतांना हमी देताना निर्विघ्न कुंभमेळ्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले.
या सोहळ्यासाठी अखिल भारतीय दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री, राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास महाराज, निरंजनी आखाड्याचे महंत धनंजयगिरी महाराज, आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत रामस्नेहीदास महाराज यांची विशेष उपस्थिती होती. तसेच पोलिस आणि प्रशासनाकडून कुंभमेळा प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंग, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, आदिवासी विभागाचे सहआयुक्त किरण जोशी, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, फ्रावशी अकॅडमीचे संस्थापक रतन लथ, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, पोलिस उपायुक्त किरण चव्हाण, किरण काळे उपस्थित होते.
सिंहस्थात पोलिसांची भूमिका मोठी - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक पोलिसांची भूमिका मोठी असणार आहे. पोलिसांशिवाय कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडूच शकणार नाही. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात पोलिसांशी संबंधित एकही अप्रिय अशी घटना समोर आली नाही. याठिकाणी कोट्यावधींच्या संख्येनी भाविक आले. मात्र, कुठलीही अप्रिय घटना समोर आली नाही. नाशिकचा कुंभ देखील पोलिसांच्या सहभागाने अशाच प्रकारे निर्विघ्नपणे पार पडेल, याची खात्री आहे.
महंत रामकिशोरदास शास्त्री, अखिल भारतीय दिगंबर आखाडा
मार्च २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण करणार - मोठे नियोजन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यावर मात करू पुढे जायचे असते. सध्या सहा हजार कोटींच्या कामांची सुरुवात झाली आहे. मार्च २०२७ पर्यंत सिंहस्थाशी संबंधित सर्व मोठे कामे पूर्ण केली जाणार आहेत. ३१ आॅक्टोंबर २०२६ रोजी होणाऱ्या कुंभमेळा ध्वजारोहणाशी संबंधित सर्व कामे अग्रक्रमाने हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी शासनाकडून ७५० कोटींचा निधी प्रशासनास वर्ग केला आहे. त्यामुळे निधीची कुठेही चणचण नाही. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरू आहेत. मोबिलिटीसाठी कोणते रस्ते लागतील याचाही विचार सुरू आहे. रिंगरोडचे काम पूर्ण केले जाणार आहे. चार ते पाच रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे विस्तारीकरण, रामकालपथ, त्र्यंबकेश्वर दर्शन पथाचे काम सुरू झाले आहे. पोलिस आयुक्तांशी चर्चा करून हे सर्व कामे केली जात आहेत. दर्जात्मक कामे केली जाणार आहेत. मोबिलिटी प्लॅनिंगवर विशेष लक्ष दिले जात आहे. सिंहस्थात तंत्रज्ञानाचा खूबीने वापर केला जाणार आहे. ४०० सीसीटीव्ही आणि ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्यावर पोलिस आयुक्तालयातून नियंत्रण ठेवले जाणार आहे. सिंहस्थाच्या नियोजनासाठी 'आयएससी'पासून सर्वांचा सल्ला घेतला जात आहे. साधू-महंतांच्या सूचना देखील आम्ही घेणार आहोत. २००३ मध्ये घडलेल्या घटनेमुळे २०१५ मध्ये प्रशासनाने थोडी कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे भाविकांची संख्या कमी झाली होती. अनेक लोकांना त्रासही झाला होता. त्यावेळी सर्वांचीच तारेवरची कसरत झाली. २०१५ चा अनुभव घेवून २०२७ चे नियोजन करताना तंत्रज्ञान प्रचंड उपयोगी पडणार आहे. किंबहुना सिंहस्थात तंत्रज्ञान गेमचेंजर ठरणार आहे.
शेखर सिंग, आयुक्त कुंभमेळा प्राधिकरण
वाहतुक व्यवस्थेवर विशेष काम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिंहस्थ, कुंभमेळ्याशी निगडीत सर्वच बारिक-सारिक कामांच्या नियोजनात लक्ष आहे. सिंहस्थाशी संबंधित सर्वच अधिकारी एक टीम म्हणून काम करीत आहेत. आम्ही जरी पुढे असलो तरी, आमच्या मागच्या टीमची जबाबदारी मोठी आहे. शहरातील वाहतुक व्यवस्थेबाबत विशेष काम केले जात आहे. नियोजनाप्रमाणे कामे केली जात आहेत. सर्वांचे अभिप्राय जाणून घेवूनच नियोजनाप्रमाणे कामे सुरू आहेेत. नाशिककरांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन कटीबद्ध आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था पुढील काळातही अबाधित राहणार आहे. माझी संपूर्ण टीम यावर काम करीत आहे. नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला आहे.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.
नाशिक कुंभ, बेस्ट कुंभ - कुंभमेळ्यात १३ आखाडे सहभागी होणार असून, या सर्वांमध्ये उत्तम समन्वय आहे. २००३ मध्ये झालेल्या सिंहस्थात चेंगराचेंगरीच्या घटनेत २९ भाविकांचा जीव गेेला होता. मात्र, या घटनेतून प्रशासनाने धडा घेत २०१५ मध्ये शाहीस्नान मार्गच बदलला. त्यामुळे कुठलही अनुचित घटना घडली नाही. यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. ज्या पद्धतीने नाशिक पोलिस काम करीत आहेत, त्यावरून येणारा सिंहस्थ देखील निर्विघ्नपणे पार पडेल याची आम्हाला खात्री आहे. पोलिस आणि प्रशासनासोबत आम्ही सर्व आखाडे एकदिलाने काम करू. नाशिक कुंभ, बेस्ट कुभ म्हणून आम्हाला जगात लौकीकास आणायचा आहे.
महंत भक्तीचरणदास, प्रवक्ते, राष्ट्रीय आखाडा परिषद
शहर सुरक्षित, शिक्षण सुंदर - पोलिस आणि प्रशासनाचे काम अत्यंंत उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक शिक्षण संस्थांनी प्रशासनाकडून प्राप्त सुचनांचे तंतोतंत पालन करायला हवे. सिंहस्थ, कुंभमेळ्यात शाहीस्नानांच्या मुहूर्तावर शाळांना सुट्टी जाहीर केल्यास, त्याबाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी तसेच महापालिकेने अगोदर दिल्यास शाळांना नियोजन करणे सोयीचे होईल. जेव्हा शहर सुरक्षित असते, तेव्हा शिक्षण सुंदर होतेे. नाशिक पोलिसांनी राबविलेल्या 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' ही मोहिम खरोखरच कौतुकास्पद आहे.
रतन लथ, संस्थापक, फ्रवशी अकॅडमी
नाशिककरांनी लाभ घ्यावा - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २४ ते २५ महिने चालणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या संत, महंतांच्या आशिर्वादाचा नाशिककरांनी लाभ घ्यावा. तीन पर्वण्यानंतरही बरेचसे मुहूर्त आहेत. त्याकाळात देखील गोदावरीत स्नान करण्याचा भाविकांनी योग साधावा. महाप्रसादाचा आस्वाद तसेच सत्संगाचाही भाविकांनी लाभ घ्यावा.
महंत रामस्नेहीदास महाराज
कुंभात पोलिसांना जास्त पुण्य मिळणार - नाशिक पोलिसांनी 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' हे ब्रिद राज्यभर रूजविले. जेवढी तपश्चर्या साधू-महंत करीत असतात, तितकीच तपश्चर्या पोलिसांना देखील करावी लागते. कारण त्यांना लोकांची सेवा करायची असते. पोलिस हे जनतेचे सेवक म्हणून काम करीत असतात. सिंहस्थात त्यांना सहा महिने, वर्षभर कष्ट करावे लागणार आहेत. आमच्यापेक्षा पोलिसांना जास्त पुण्य मिळणार आहे. प्रशासनाकडून वेळेवर कामे केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात वेळ किती राहिला याचा विचार करायला हवा. २०२६-२७ मध्ये कुंभ असून, प्रशासनाकडे अवघ्या दहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. त्यातील दोन महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेत जाणार आहेत. उर्वरीत महिन्यांमध्ये कामे कसे होणार? प्रशासनाने सिंहस्थ, कुंभमेळा गांभीर्याने घ्यायला हवा. कारण पुढील दीड वर्षात तीन कुंभ होणार आहेत. हरिद्वार, उज्जेनचा कुंभ होणार आहे. मात्र, प्रशासनाची तयारी केवळ कागदोपत्री दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कामे सुरू करावीत. केवळ बोलू नये. ही राजकीय भाषा आहे.
महंत शंकरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष, आनंद आखाडा
साधना आणि शिक्षण एकच आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात विद्यार्थ्यांनी देखील सहभागी व्हावे. विविध उपक्रम राबवून सिंहस्थात आपला सहभाग नोंदवावा. सिंहस्थ कुंभमेळा हा भाविकांसाठी पर्वणी असतो. नाशिककर पुण्यवान आहेत. त्यांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होवून, येणाऱ्या भक्तांची सेवा करावी.
धनंजयगिरी महाराज, निरंजनी आखाडा
सिंहस्थ सर्वांचीच जबाबदारी - नाशिकमध्ये साधू-महंत येणार असून, सर्व नाशिककरांनी त्यांचे आपुलकीने स्वागत करायला हवे. आपण सेवेची कामे करीत आहोत. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचे चांगले स्वागत करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. सिंहस्थात अनुचित प्रकार घडणार नाही, याचीही आपण सर्वांनी घबरदारी घ्यायला हवी.
किरण जोशी, सहआयुक्त, आदिवासी विभाग.
प्रयागराजप्रमाणे बेंचमार्क व्हावा - बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थानिमित्त नाशिकमध्ये विकास कामे होत आहेत. प्रयागराजमधील कुंभमेळ्याने जसा बेंचमार्क निर्माण केला, तसाच आपल्याला देखील करायचा आहे. सर्वांचेच स्वागत करताना त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
योगेंद्र चौधरी, उपायुक्त, नियोजन विभाग