

नाशिक : प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. आपल्या कामाकडे कुणाचेही बोट उठता कामा नये, असे सांगत त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सर्व कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याचे आवाहन केले.
जिल्हा दौर्यावर असलेल्या मंत्री भोसले यांनी गुरुवारी (दि. ३०) सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीस कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढली असून, भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाला जोडणारा रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक शहराबाहेरुनच भाविकांना थेट त्र्यंबकेश्वरला जाता येईल. या रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच या कामाला प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात दर्शनपथ तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात एमएसडीआयसीच्या अधिकार्यांनी आराखडा व संकल्पचित्र सादर केले. दर्शनपथ साकारताना पावसाळ्यात उपयुक्त ठरतील, अशा उपाययोजना कराव्यात, भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश मंत्री भोसले यांनी दिले.
विमानतळाचे विस्तारीकरण
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नाशिक विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यात नवीन पार्किंग, धावपट्टी, प्रवाशांसाठीच्या सुविधांचा समावेश आहे. एकूण ७४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विद्यमान विमानतळाच्या रचनेशी सुसंगत अशा पद्धतीने विस्तार होणार असून त्याचा आकार गरुड पक्ष्याप्रमाणे दिसणार आहे. प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान एका दिवसात सुमारे २३ हजार प्रवासी विमानाने आले होते. त्याच धर्तीवर नाशिक विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.