नाशिक : रेल्वे मंत्रालयाने नाशिक- त्र्यंबकेश्वर- डहाणू रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणास हिरवा सिग्नल दिला आहे. या 100 किलोमीटर प्रस्तावित मार्गामुळे मध्य रेल्वेवरील नाशिक थेट पश्चिम रेल्वेशी जोडले जाणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या वाढवण बंदराशी कनेक्टिव्हिटी प्राप्त होईल.
महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून आश्वासक पावले उचलण्यात येत आहेत. बहुचर्चित नाशिक-त्र्यंबकेश्वर-वाणगाव-डहाणू या रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्याकरिता अडीच कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून चर्चेत असलेल्या या मार्गाच्या मागणीला मूर्त स्वरूप येणार आहे.
नाशिक - डहाणू रेल्वेमार्गाने थेट कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे डहाणू गाठण्यासाठी रेल्वे गाड्या दक्षिणेकडून कल्याण, भिवंडी-वसईमार्गे अथवा धुळे-नंदुरबार-सुरतमार्गे चालविल्या जातात. पण, या प्रवासासाठी किमान ८ ते १० तासांचा कालावधी लागत होता. या दोन शहरांदरम्यान, रेल्वेलाइन टाकावी, अशी जुनीच मागणी आहे. त्या अनुषंगाने काही वर्षांपूर्वी या मार्गाचे सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले होते. परंतु मार्गातील डोंगर-दऱ्या, घाट व नद्यांमुळे प्रकल्पावर फुली मारली गेली होती. त्यानंतर ९५ किलोमीटरचा इगतपुरी-खोडाळा-मोखाडा-जव्हार-विक्रमगड-उमरोली असा हा मार्ग नेण्याचा पर्याय पुढे आला होता. पण, रेल्वे मंत्रालयाने नाशिक-त्र्यंबकेश्वर-डहाणू या पूर्वीच्याच मार्गाला पसंती दिली आहे. त्यामुळे नाशिक व पालघर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला हातभार लागणार आहे.
प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे नाशिक हे डहाणूमार्गे थेट पश्चिम रेल्वेशी जोडले जाईल. त्यामुळे भविष्यात नाशिककरांना रेल्वेने थेट गुजरात व राजस्थानशी कनेक्ट होता येईल. तसेच डहाणूमार्गे पुढे पश्चिम रेल्वेवरील बोरिवली, अंधेरीला जाणे शक्य होणार असल्याने नाशिककरांचा प्रवास अधिक सुखकर व जलद होईल.
नाशिक रोड येथून मध्य रेल्वेची मुंबई व भुसावळ ही मुख्य रेल्वे मार्गिका जाते. येत्या काळात नाशिक- डहाणू ब्रॉडगेज रेल्वेलाइनमुळे नाशिकला जंक्शनचा दर्जा प्राप्त होईल. तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वरही रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.