

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे जगभरातून येणा-या भाविकांसाठी नवीन घाट तयार केले जाणार आहेत. त्यांचा आराखडा त्वरीत सादर करण्याची सूचना कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने घाटांशी संबंधित नियोजनासंदर्भात शुक्रवारी (दि. १९) बैठक झाली. बैठकीत ते बोलत होते. आयुक्त सिंह म्हणाले, जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी एकत्रितपणे घाटांची पाहणी करावी. पाहणी दरम्यान घाटांचे नामकरण व अंतिम यादी निश्चित करावी. वापरायोग्य घाट व त्यांची लांबी, क्षेत्रफळ, प्रत्येक घाटाची वहन क्षमता, प्रत्येक व्यक्तीची घाटांवर थांबण्याची किमान वेळ त्यासाठीची गणना पध्दत व सूत्र निश्चित करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
घाटांचे क्षेत्रफळ व जिओ टॅग लोकेशन निश्चित असावे, घाटांची वहन क्षमता, घाटांकडे येणाऱ्या मार्गावरील गर्दीचे नियोजन करावे, घाटांवर नागरिक व अतिमहत्वाच्या व्यक्तींची प्रवेश व्यवस्था करावी, वाहनतळ व्यवस्था करण्यात यावी, आपत्कालिन काळात सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपायोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, तांत्रिक सहाय्यक व्ही. जी. महाले, महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल उपस्थित होते.