

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : सिंहस्थ कुंभमेळा हा कुशावर्तावर भरतो आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळयाचे अमृत स्नान कूशावर्त घाटावरच झाले पाहिजे याबाबत साधू ठाम आहेत. सरकार पर्यायी घाट बांधत असल्यास आमचा विरोध नाही. मात्र कुशावर्ताचे महत्व कमी व्हायला नको, असा इशारा बडा उदसीन आखाडयाचे महंत दुर्गादास महाराज यांनी दिला आहे.
सिंहस्थ कुंभमेळयासाठी शासनाने ३५०० कोटी रूपयांची विकास कामे सुरू केली आहेत. मात्र या कामांमध्ये त्र्यंबकेश्वरच्या १० शैव साधु आखाड्यांना आणि किमान १०० आश्रम मठांना काहीही दिलेले नाही. त्यामुळे साधु महंतांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यातही त्र्यंबकेश्वरच्या १० आखडयापैकी बडा उदासीन, नया उदासीन आणि निर्मल पंचायत या तीन आखाड्यांची स्वतंत्र उदासीन निर्मल परिषद स्थापन करण्यात आली आहे.
कुंभमेळयाचे प्राचीन स्थान असलेल्या कुशावर्त घाटाचे महत्व कमी होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. कुंभमेळा स्नान कुशावर्तावर होणार आहे. साधु आणि भक्त केवळ कुशावर्तावर स्नानासाठी येतात. शासनाने भक्तांच्या भावना आणि श्रध्दा यांच्याशी खेळ होईल असे निर्णय घेऊ नये .
महंत दुर्गादास महाराज, बडा उदासीन
सिंहस्थ कुंभमेळयाचे नियोजन करतांना शासनाने सर्व दहा आखाड्यांच्या प्रतिनिधींच्या सोबत चर्चा करावी, अशी मागणी महंत दुर्गादास महाराज यांनी केली. शैव आखाड्यांचा कुंभमेळा त्र्यंबकेश्वरला भरतो मात्र आखाड्यांसाठी अद्यापपर्यंत शासनाने कोणतीही तरतुद केलेली दिसत नाही . प्रत्येक आखाडयाच्या अंतर्गत होणारी सेवासुविधांची कामे गुलदस्त्यात आहे. शहरातील रस्त्यांची कामे होत आहेत. मात्र त्यात शाही मार्गाचा अथवा अमृतस्नान मार्गाचा समावेश नाही. कुशावर्त घाटाबाबत तरतूद नाही. शासनाला नेमका कुंभमेळा कोणासाठी करावयाचा आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
त्र्यंबकेश्वर शहर आणि तालुक्यात ३५०० कोटी रूपयांची कामे सुरू झाली आहेत. मात्र त्यामध्ये प्रत्यक्ष कुंभमेळा भरतो त्या कुशावर्त घाटावर कोणते काम होणार आहे? तसेच त्र्यंबकेश्वर येथे असलेले १० आखाखडे आणि किमान १०० मठ व आश्रम यांचे लक्षावधी भक्त कुंभमेळ्यासाठी येतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निवास व्यवस्था, स्वच्छतागृह, आखाडे आणि आश्रम यांना जोडणारे पक्के रस्ते,सार्वजनिक दिवाबत्ती यासारख्या सुविधा उभारणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. याबाबत त्र्यंबकेश्वर येथील बहतांश साधु महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे.