

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यावर सोपविल्याने नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार नाराज झालेले असतांनाच मंत्री भुजबळ अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. भुजबळांनी कुंभमेळामंत्री महाजनांवर 'नेहेले पे देहेला' फेकत गुरुवारी (दि. 21) सिंहस्थाची बैठक घेण्याबाबत जिल्हाधिकार्यांना पत्र दिले आहे. यामुळे जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ आणि जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीष महाजन यांच्यात वाक्युध्द सुरु असतांनाच 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी गोंदियात ध्वजारोहण करण्याचे शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर भुजबळांनी गोंदियात जाण्यास नकार दिला. यामुळे त्यांची नाराजी स्पष्टपणे उघड झाली होती. अशातच भुजबळांकडून गुरूवारी दुपारी सिंहस्थ बैठक घेण्याबाबत जिल्हाधिकार्यांना पत्र देण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मंत्री महाजन यांनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात सिंहस्थाबाबत संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर दोनच दिवसांनी मंत्री भुजबळ सिंहस्थ आणि उद्योजकांची बैठक घेत आहेत. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्याच्या विकास आखाराड्याचे नियोजनही रखडले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत. अशातच पालकमंत्रीपदासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक आहेत. मागील काळात पालकमंत्रिपदावरुन भुसे आणि महाजन, मंत्री माणिकराव कोकाटे आणि भुजबळ यांच्यात टोलवाटोलवी सुरु होती. अशातच धुळ्यात दहीहंडीच्या निमित्ताने आलेल्या महाजनांनी मला नाशिकचा पालकमंत्री व्हायचेय असा मनसुबा जाहीर केला होता. तर जळगाव येथे झालेल्या मेळाव्यात भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत भाष्य करताना जिल्ह्यात सात आमदार असताना आमदारांनी यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असल्याचे सूचक वक्तव्य केले होते.
आणि आता सिंहस्थाची बैठक घेण्याबाबत जिल्हाधिकार्यांना पत्र दिले आहे. यामुळे भुजबळ आणि महाजन यांच्यात पुन्हा एकदा वाक्युध्द रंगण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपने महाजन यांच्यावर कुंभमेळामंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे तर भुजबळ पालकंत्रीपदासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे आता येणार्या काळात राजकीय घडामोडी कशा वळण घेतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.