

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या विस्तारित मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेसाठी प्राप्त चार निविदा अपात्र ठरविण्यात आल्यानंतर नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशिष्ट मक्तेदार कंपनीला या निविदा प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी मागणी नसताना देखील मुदतवाढ दिली गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, संबंधित विभागातील अधिकार्यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
शहराला गंगापूर, दारणा व मुकणे या तीन धरणांमधून प्रामुख्याने पाणी पुरविले जाते. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता 2017 मध्ये मुकणे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेमधून सध्या विल्होळीपर्यंत थेट जलवाहिनीद्वारे पाणी येते. या ठिकाणी 137 एमएलडी प्रतिदिन पाणी शुद्धीकरण करण्यासाठी चार केंद्रे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीमध्ये एकच केंद्र सुरू आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात येणार्या साधू-महंत व भाविक तसेच शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी मुकणे धरणातून विस्तारित पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. या अंतर्गत विल्होळी येथे 274 एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार असून, विल्होळी ते साधुग्रामपर्यंत थेट जलवाहिनी टाकली जाणार आहे.
या योजनेसाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्यानंतर पहिल्यांदा दोनच मक्तेदारांनी काम करण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे निविदा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतीत विष्णू प्रकाश पुंगलिया लिमिटेड, कोया कन्स्ट्रक्शन कंपनी, एनसीसी, जेडब्ल्यूआयएल या चार कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. मात्र, तांत्रिक तपासणीत या चारही निविदा अपात्र ठरल्या होत्या. त्यामुळे अल्पमुदतीच्या फेरनिविदा मागविण्यात आल्या होत्या. या फेरनिविदांच्या सादरीकरणाची मुदत 19 सप्टेंबर रोजी दुपारी संपणार होती. मात्र ही मुदत संपण्यापूर्वीच अचानक आणखी तीन दिवसांची मुदतवाढ दिली गेली आहे.
फेरनिविदेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच मागणी नसताना मुदतवाढ दिली गेल्याने प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा संशयाच्या भोवर्यात आली आहे. आता 22 सप्टेंबरपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत असणार असून, दि. 23 रोजी प्राप्त निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. दरम्यान, विशिष्ट मक्तेदारासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा आहे.