

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापनासाठी तब्बल तीनशे कोटी रुपये खर्चून चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासंदर्भात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीमार्फत निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात तीन हजार तर त्र्यंबकेश्वर शहरात एक हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जाणार असून ५०० ठिकाणी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (एएनपीआर) कॅमेऱ्यांचा यात समावेश आहे.
येत्या २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यात झालेली गर्दी पाहता नाशिकच्या सिंहस्थात पाच लाख साधू महंतासह १० कोटी भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविला जात आहे. त्यानुसार साधू-महंतासह भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन प्रशासनामार्फत सुरू आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांना सुविधा देण्यासह त्यांची सुरक्षा तसेच कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न असणार आहे. त्यासाठी गर्दी नियंत्रणाकरीता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. त्यादृष्टीने नाशिकमध्ये तीन हजार तर त्र्यंबकेश्वरमध्ये एक हजार सीसीटिव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने तीनशे कोटींच्या सीसीटीव कॅमेऱ्यांसाठी निविदा मागविल्या आहेत.
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून यापूर्वी शहरात १,३०० सीसीटीव्ही बसविण्यात आले असून लाईव्ह मॉनिटरिंगसाठी कमांड अँड कंट्रोल रूमशी जोडण्यात आले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आणखी तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे शाही मार्ग (शाही मिरवणुकीचा मार्ग), साधुग्राम, रामकुंडकडे जाणारे सर्व रस्ते, गोदाघाट, शहराचे प्रवेशद्वार, पार्किंग आदी ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.
सिंहस्थ प्राधिकरणाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी चार हजार सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीला दिले आहे. त्यानुसार निविदा तयार करून ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी, नाशिक
तीन हजार कॅमेऱ्यांपैकी ५०० ठिकाणी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (एएनपीआर) कॅमेरे बसविले जाणार आहेत. प्रामुख्याने सिग्नलच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविले जातील. त्यामुळे नियम तोडणाऱ्या वाहनांना ऑनलाईन दंड करता येणार आहे.
तीनशे कोटींचा प्रकल्प खर्चात डेटा सेंटर, देखरेखीसाठी ड्रोन कॅमेरे आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे एकत्रीकरण यासह इतर संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांचा खर्च देखील समावेश आहे