

नाशिक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या राज्य शासनाकडे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याकरीता निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आता केंद्र आणि राज्याच्या विविध विभागांकडे सिंहस्थ कामांसाठी जोगवा मागण्याची वेळ आली आहे. राज्याच्या विविध खात्यांनी आपल्या निधीतून सिंहस्थ कामांना हातभार लावण्याची सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केली आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडे शुक्रवारी(दि.१२) बैठक पार पडली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने १५ हजार कोटी तर अन्य विभागांनी नऊ हजार कोटी अशा एकूण २४ हजार कोटींच्या कामांचा आराखडा शासनाला सादर करण्यात आला होता. सिंहस्थासाठी आता दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असताना अद्याप सिंहस्थ कामांना प्रत्यक्ष सुरूवात होऊ शकलेली नाही. सिंहस्थ कामांसंदर्भात केवळ बैठकांवर बैठका होत आहेत.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये सिंहस्थासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली. त्याउपर सिंहस्थासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. सिंहस्थासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्याकडे प्राधिकरणाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शासनाने मंजूर केलेल्या हजार कोटींच्या निधीच्या जोरावर प्राधिकरणाने ५१४० कोटी रूपयांची कामे मंजूर केली असून त्यापैकी ३२७७.५८ कोटी रूपयांची कामे मार्च २०२६ पर्यंत करावयाची आहेत. निधीच्या उपलब्धतेचा निर्णय अद्याप पुढे सरकत नसल्याने निविदा प्रक्रियेच्या पुढे कामांची गती पुढे सरकू शकलेली नाही.
शुक्रवारी (दि.१२) मुंबईत मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंहस्थ कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी केंद्र व राज्याच्या विविध मंत्रालयांच्या सहभागातून सिंहस्थ कामे करण्याचे सूचित करण्यात आले. राज्यातील विविध विभागांनी आपल्याकडील निधीतून सिंहस्थ कामांना बळ देण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी केल्या. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी, उड्डान मंत्रालयाने विमानतळ विकास, गृह मंत्रालयाने सुरक्षाविषयक कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, विविध विभागांच्या अभिसरणातून सिंहस्थ कामे केली जावीत, अशा सूचना मुख्य सचिवांनी या बैठकीत दिल्याचे समजते. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, प्राधिकरण आयुक्त करिष्मा नायर या बैठकीस उपस्थित होत्या.