

ठळक मुद्दे
नाशिकरोडसह देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे रेल्वे स्थानकांचा विकास होणार
मनपा हद्दीलगत आठ रस्त्यांवर २२ ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली जाणार
पाचही स्थानकांमध्ये फलाटांवर छत, पाण्याच्या टाक्या, शौचालये, जलरोधक यांचीही व्यवस्था
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोडसह देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. या पाचही रेल्वेस्थानकांवर भाविकांना उतरविले जाणार असून या रेल्वेस्थानकांपासून गोदाघाटाकडे आणण्यासाठी भाविकांकरीता बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. बसेससाठी पार्किंग, आत व बाहेर पडण्याचे मार्ग, भाविकांसाठी निवारा व इतर सुविधांबाबत विभागीय आयुक्तांकडे सादर झालेल्या आराखड्यांपैकी खेरवाडी व कसबेसुकेणे या दोन आराखड्यांना आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी हिरवा कंदील दाखविला. तर नाशिकरोड, देवळाली व ओढा स्थानकांचे सुधारीत आराखडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेसह रेल्वे, राज्य परिवहन विभागाची आढावा बैठक पार पडली. सिंहस्थातील अमृतस्नानाच्या पर्वणी काळात एक कोटी, तर वर्षभरात पाच कोटी भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. सिंहस्थ काळात शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन व्यवस्था कोलमडू नये, यासाठी मनपा हद्दीलगत आठ रस्त्यांवर २२ ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. त्याठिकाणी भाविकांसाठी बसेस उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त बहुतांश भाविक हे रेल्वेमार्गाने नाशिकला येतील, त्याअनुषंगाने पाच रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना गोदाघाटाच्या दिशेने येण्यासाठी बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी स्थानक परिसरात बसेससाठी पार्किंग, भाविकांना थांबण्यासाठी निवारा, बसेस बाहेर पडण्यासाठी मार्ग, बस थांबे याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने सादर केलेल्या आराखड्यापैकी कसबेसुकेणे आणि खेरवाडीच्या आराखड्यांना मंजुरी देत नाशिकरोड, देवळाली व ओढासाठी सुधारीत नियोजन सादर करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले. बैठकीस रेल्वे प्रशासनासह पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच सिंहस्थ प्राधिकरणाच्या आयुक्त करिष्मा नायर, मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते.
नाशिकरोड रेल्वे स्थानकात सध्याच्या २२ बोगींऐवजी २४ बोगी असणाऱ्या रेल्वेगाडीच्या वाहनतळासाठी दोन मार्गिका विकसीत केल्या जाणार आहेत. तसेच फलाट क्रमांक एकचाही विस्तार होणार आहे. या विकासामुळे वेगवेगळ्या दिशांना रेल्वेगाडी थांबविणे (शेवटचे स्थानक) आणि नव्याने तिचा प्रवास सुरू करणे (उगमस्थान) म्हणून करण्यास मदत होणार आहे. रेल्वे स्थानकात भाविकांची ये-जा सुलभ व्हावी, यासाठी प्रवाशांना थांबण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पाचही स्थानकांमध्ये फलाटांवर छत, पाण्याच्या टाक्या, शौचालये, जलरोधक मोकळ्या जागा यांचीही व्यवस्था असेल.