

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधांच्या नावाखाली श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या २८८ कोटींच्या विकास आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र मूळ सिंहस्थ भूमी असलेल्या नाशिकच्या सिंहस्थ आराखड्याला अद्याप शासन मंजुरी मिळू शकली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येत्या २०२६-२७मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या अनुषंगाने नाशिक महापालिकेने १५ हजार कोटींचा, तर अन्य विभागांचा नऊ हजार कोटी अशाप्रकारे एकूण २४ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाला सादर झाला आहे. सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची शासनाकडून निर्मिती करण्यात आली. मात्र कुंभमेळ्याला दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला असताना सिंहस्थ आराखड्याला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. नाही म्हणायला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये एक हजार कोटींची तरतूद सिंहस्थासाठी केली गेली. शासनाकडून अधिक निधी उपलब्ध होण्याच्या अपेक्षेने सिंहस्थ प्राधिकरणाने सुमारे पाच हजार कोटींची कामे कार्यवाहीत आणण्याची तयारी केली आहे.
एकीकडे सिंहस्थ कामांसाठी शासनाकडून निधीची प्रतीक्षा असताना आणि नाशिकच्या ओझर विमानतळाच्या नाईट लाईंडींगचा प्रश्न कायम असताना प्रत्यक्ष सिंहस्थ भूमीतील कामांसाठी तरतूद न करता शासनाकडून शिर्डी विमानतळ विकासासाठी निधी दिला गेला. यामुळे निर्माण झालेली नाराजी कायम असताना आता शासनाने श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराच्या विकासकामांसाठी २८८ कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील साधु-महंतांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. भीमाशंकर परिसराचा विकास झालाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर सिंहस्थ भूमीसाठी देखील शासनाने निधी मंजूर करायला हवा, अशी मागणी नाशिकमधून होत आहे.
सिंहस्थाच्या गर्दी व्यवस्थापनांतर्गत श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरासाठी हा निधी शासनाने मंजूर केला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यासंदर्भातील प्रस्ताव सादर झाला होता. याअंतर्गत निगडाळे भाविक सुविधा केंद्र व वाहनतळ विकास, भीमाशंकर बसस्थानक, ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकास, महादेव वन विकास, राजगुरूनगर, नवीन मार्गिका व श्री कोटेश्वर मंदिर जीर्णोध्दार आणि ट्रॅकींग ट्रेल विकासाची कामे तसेच विविध रस्ते विकास, रोप-वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आली आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची शासनाकडून विचारणा सुरू झाल्याने आता महापालिका आयुक्तांनी सिंहस्थांतर्गत प्रत्यक्षात सुरू असलेली कामे, निविदा प्रक्रियेतील कामे व सुरू करावयाच्या कामांची यादी संकलित करण्याच्या सूचना खातेप्रमुखांना दिल्या आहेत.
२०२६-२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे. सिंहस्थासाठी विधिमंडळ अधिवेशनात १००४ कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्या पाठोपाठ प्राधिकरणाने ३०६८ कोटी रुपयांचा निधीची कामे प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राधिकरणाच्या बैठकीत पाच कोटी भाविक तसेच जवळपास दहा लाख साधू व संत पर्वणीच्या दिवशी उपस्थित राहतील, असे नियोजन आहे. परंतु नियोजन व पायाभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी अद्याप एकही काम हाती घेण्यात आलेले नाही. पाच पुलांची कामे अद्यापही कागदावर आहेत. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविला जात आहे. नुकतेच संबंधित कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. साधुग्राम भूसंपादन प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. महापालिकेच्या तुलनेत सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांमार्फत कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रत्यक्ष कामांची प्रगती जाणून घेण्यासाठी विभागप्रमुखांना कामांच्या यादी सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.