

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याने वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विकासकामांबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना विश्वासात घेण्यासाठी आता सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शहरातील सुरू असलेल्या सिंहस्थ विकासकामांची अद्ययावत माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रस्ते, ड्रेनेज, साधुग्राम अंडरपाससह विविध सिव्हिल वर्क सुरू आहेत. मात्र, एकाच वेळी अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. कोणत्या भागात कोणते काम सुरू आहे, ते कधी पूर्ण होणार, याची पुरेशी माहिती नागरिकांना उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाविरोधातील रोष वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाच्या डॅशबोर्डवर प्रत्येक विकासकामाची सद्यस्थिती, कामाची पूर्ण झालेली टक्केवारी, कामाची निर्धारित मुदत आणि अपेक्षित पूर्णत्वाची तारीख यासह आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना एका क्लिकवर त्यांच्या परिसरातील विकासकामांची माहिती मिळणार आहे.
विकासकामांच्या प्रगतीवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी तसेच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी हा डॅशबोर्ड महत्त्वाचा ठरणार आहे. प्रशासनाने सिंहस्थ कामांसाठी सविस्तर वेळापत्रक तयार केले असून, सर्व कामे टप्प्याटप्प्याने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. सिव्हिल वर्कची बहुतांश कामे पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या डॅशबोर्डमुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये थेट संवाद निर्माण होण्यास मदत होणार असून, विकासकामांची वस्तुस्थिती नागरिकांसमोर स्पष्टपणे येणार आहे.