

नाशिक :
सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शासकीय विकासकामे आणि निविदा प्रक्रियेला वेग येत असतानाच, जुन्या निविदा फसवणुकीच्या प्रकरणाने पुन्हा डोकेवर काढले आहे. शहर पोलिस मुख्यालयातील जुन्या व जीर्ण इमारती पाडण्याचे कंत्राट मिळाल्याचे भासवून व्यावसायिकाची १२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकारवाडा ठाण्यात धुळ्यातील संशयितासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश दिनकर कापसे (४२, रा. मेहेरधाम स्टॉप, पेठ रोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित विनय सुरेश शेवाळे (रा. परेजपूर, ता. साक्री, जि. धुळे) आणि पाटील (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात, रा. नाशिक) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, जून २०२० ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संशयितांनी कापसे यांच्याशी संपर्क साधला. शहर पोलिस मुख्यालयातील जुन्या व जीर्ण इमारती पाडण्याचे कंत्राट आपल्याला मिळाले असून, हे काम कापसे यांना मिळवून देऊ, असे आमिष त्यांनी दाखविले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून कापसे यांनी त्र्यंबक रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारात दोन साक्षीदारांसमक्ष संशयितांना १२ लाख २० हजार रुपये रोख दिले. मात्र, पोलिस मुख्यालयातील जीर्ण इमारती पाडून त्यातील भंगार साहित्य विक्री करण्यासाठी काढण्यात आलेली
ऑनलाइन निविदा अन्य व्यक्तीला मिळाल्याचे कापसे यांच्या लक्षात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संशयितांकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्यावेळी संशयितांनी नोटरी केलेले समजुतीचे पत्र आणि उसनवारीची पावती देत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. तसेच, १२ लाख २० हजार रुपयांचे धनादेशही दिले. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हे धनादेश वटले नाहीत.
वारंवार पाठपुरावा करूनही पैसे परत मिळत नसल्याने अखेर कापसे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गुरुवारी (दि. ८) सरकारवाडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. सहायक पोलिस उपनिरीक्षक शरद सोनवणे या प्रकरणाचा तपास करीत असून, दोन्ही संशयितांचा शोध सुरू आहे.