

ठळक मुद्दे
सोने दीड लाखाच्या तर चांदी दोन लाखाच्या दिशाच्या वेगाने आगेकुच
सोनेदरवढाचे मुख्य कारण म्हणजे युएस फेडरल बँकेचे व्याजदर कमी होणार हे आहे
आठ दिवसात चांदी तब्बल १८ हजार ५४० रुपयांनी महागली तर सोन्यालाही तब्बल चाडेचार हजारांची झळाळी
Gold and silver price today
नाशिक : सोने-चांदीतील दरवाढीने पुन्हा एकदा वेग पकडला असून, सोने दीड लाखाच्या तर चांदी दोन लाखाच्या दिशेने वेगाने आगेकुच करीत आहे. सोने बाजारात शुक्रवारप्रमाणेच (दि.२८) शनिवारही (दि.२९) दरवाढीचा वार ठरला आहे. एकाच झटक्यात चांदीत तब्बल साडेसहा हजारांची दरवाढ नोंदविली गेली असून, मागील आठ दिवसात चांदी तब्बल १८ हजार ५४० रुपयांनी महागली आहे. तर सोन्यालाही तब्बल चाडेचार हजारांची झळाळी मिळाली आहे.
सध्या लगीनसराई असल्याने सोने-चांदीचा बाजार तेजीत आहे. मात्र, दरवाढीमुळे यजमानांचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींमुळे मौल्यवान धातुंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. विशेषत: चांदीमध्ये मोठी तेजी नोंदविली जात आहे. गेल्या २२ नोव्हेंबर (शनिवार) रोजी चांदीचा दर प्रति किलो १ लाख ६० हजार ६८० रुपये इतका होता. हाच दर २९ नोव्हेंबर (शनिवार) रोजी एक लाख ७९ हजार २२० रुपये इतका नोंदविला आहे. अवघ्या आठच दिवसात चांदीत तब्बल १८ हजार ५४० रुपयांची दरवाढ नोंदविली गेली आहे. दरवाढीचा वेग लक्षात घेता, पुढच्या काही दिवसातच चांदी पुन्हा एकदा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.
चांदीप्रमाणेच सोने दरही सुसाट आहेत. २२ नोव्हेंबर (शनिवार) रोजी २४ कॅरेट सोने दर प्रति तोळा १ लाख २७ हजार ६७० रुपये इतका नोंदविला गेला होता. २९ नोव्हेंबर रोजी हा दर प्रति तोळा १ लाख ३२ हजार १५० रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या दरात अवघ्या आठच दिवसात तब्बल चार हजार ४८० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. सोने-चांदीच्या वाढत्या दरांमुळे सराफ बाजारात पारंपारिक ग्राहकांची संख्या कमी झाली असली तरी, गुंतवणूकदार मात्र चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
२२ नोव्हेंबर (शनिवार) रोजीचे दर असे ....
२४ कॅरेट सोने- प्रति तोळा - १,२७,६७०
२२ कॅरेट सोने- प्रति तोळा - १,१७,४५०
चांदी - प्रति किलो - १,६०,६८०
२९ नोव्हेंबर (शनिवार) दर असे...
२४ कॅरेट सोने - प्रति तोळा - १,३२,१५०
२२ कॅरेट सोने - प्रति तोळा - १,२१,५८०
चांदी - प्रति किलो - १,७९,२२०
(सर्व दर जीएसटीसह)
सोनेदरवढाचे मुख्य कारण
जळगावमधील प्रसिध्द सराफी आकाश भंगाळे यांनी दरवाढीबाबत टिप्पणी करताना सांगितले की, गेल्या आठवड्यामध्ये सोनेदरवढाचे मुख्य कारण म्हणजे युएस फेडरल बँकेचे व्याजदर कमी होणार हे आहे. डिसेंबर महिन्यात त्यांची बैठक होणार आहे, जर व्याजदर कमी कमी झाले तर सोन्याचे दर अजून वाढतील.