

सिन्नर (नाशिक): शेतातील काम आटोपून घराकडे निघालेल्या आईसोबत जाणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याने झडप मारली. या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. शुक्रवारी (दि.20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोंदे शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली.
जान्हवी सुरेश मेंगाळ वय वर्षे 4 असे मृत चिमुकलीचे नाव आहे. मेंगाळ कुटुंबीय गोंदे - दातली रस्त्यालगतच्या वस्तीवर वास्तव्यास आहे. मूळचे चास - नळवाडी येथील असलेले मेंगाळ कुटुंबीय काही दिवसांपासून शरद तांबे यांची शेती वाट्याने करीत आहेत. त्यांचे राहते घरापासून जवळच असलेल्या अरुण नाठे यांच्या शेतात भुईमूग काढण्याचे काम सुरू होते. आई मीना मेंगाळ यांच्यासोबत जान्हवी शेतात खेळत होती. काम आटोपल्यानंतर आई सोबत जात असतानाच ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकलीवर हल्ला केला आणि तिची मान जबड्यात पकडली. हा प्रकार लक्षात येताच मीना मेंगाळ यांच्यासह सोबतच्या महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून धूम ठोकली. अवघ्या काही क्षणातच ही घटना घडली.
मानेला गंभीर दुखापत झालेल्या जान्हवीला तात्काळ सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तथापि प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी हलविण्याचा सल्ला दिला. सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिमुकलीला तपासून मृत घोषित केले. या घटनेने गोंदेशिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान पोलीस पाटील ज्योती बाळासाहेब तांबे यांनी पोलीस व वनविभागाला घटनेची माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांकडून रात्री उशिरा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांच्यासह सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर उपस्थित होते. घटनास्थळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असल्याची माहिती पारेकर यांनी दिली.